सर्वत्र खडी विखुरल्याने वाहनांना धोकादायक. आतापर्यंत अनेक दुचाकी वाहनांना अपघात. लवकर डागडुजी करण्याची मागणी. एका वर्षातच रस्ता उखडला.
डिचोली/प्रतिनिधी
उभारण्यात आलेल्या नवीन पुलाच्या जोडरस्त्याची पार दुर्दशा झाल्याने आतापर्यंत दुचाकी वाहनांना अनेक अपघात रस्त्यावर विखुरलेल्या खडीमुळे घडले आहेत. गेल्यावर मे महिन्यात सदर पुलाचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर लगेच एका वर्षातच हा रस्ता उखडला गेल्याने आता तो धोकादायक बनला आहे.
विठ्ठलापूर ते साखळीला बाजाराच्या परिसरात जोडण्यासाठी पूर्वी असलेला लोखंडी पदपूल जमिनदोस्त करून नवीन पुल उभारण्यात आला होता. गेल्या मे महिन्यात या पुलाचे उदघाटन झाले होते. ता पुलामुळे साखळीत विशेषतः बाजारात येणाऱया लोकांची चांगली सोय होते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु खराब रस्त्यामुळे सध्या या रस्त्यावरून वाहने विशेषतः दुचाकी हाकणे धोकादायक ठरले आहे.
गेल्या मे महिन्यात या पुलाचे उदघाटन झाल्यानंतर पावसाचा प्रारंभ झाला होता. पहिला पाऊस कसाबसा झेलल्यानंतर या पुलाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या जोडरस्त्यांचे डांबर उखडल्याने खडी रस्त्यावर अस्तव्यस्त विखुरली आहे. या उखडलेल्या खडीमुळे बंदरवाडा बाजूने पुलाजवळ असलेल्या वळणावर अनेकजणांना अपघात घडला आहे. खडीवर घसरून अनेकजण याठिकाणी पडले आहेत.
विठ्ठलापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेत तसेच साखळीतील शाळा, हायस्कुलांमध्ये सकाळी विद्यार्थ्यांना पोहोचविण्याच्या घाईगडबडीत असलेल्या पालकांनाही अनेक या रस्तावरील खडीमुळे अपघात घडलेले आहेत. पालकांबरोबर लहान मुलेही दुचाकी वाहनांवरून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे खड्डे चुकवितानाही अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत. या समस्येवर सरकारने तसेच मयेचज आमदार व मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
रस्त्याची तातडीने डागडुजी करावी

विठ्ठलापूर व साखळीला जोडण्यासाठी पक्का पुल उभारला हे सरकार आणि मुख्यमंत्र्यांची चांगली संकल्पना आणि काम आहे. परंतु आज या पुलाच्या जोडरस्त्याची स्थिती जिवघेणी ठरत आहे. याकडे तातडीने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. मोठय़ा संख्येने वाहनांची या रस्त्यावर ये जा असते. त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी हि सरकारची आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष न करता रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक महेश सावंत यांनी केली आहे.









