नगरपालिका खुल्या नाट्यगृहात थेट प्रेक्षपण: अनेकांनी अनुभवला गौरवास्पद प्रसंग
विटा/प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये विटा शहराने देशात पहिला क्रमांक पटकवला. दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पालिकेला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील, स्वच्छता कर्मचारी शांताबाई हत्तीकर उपस्थित होते. येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात या सोहळ्याचे थेट प्रेक्षेपण दाखवण्यात आले. त्यासाठी मोठ्या संख्येने विटेकर नागरीक उपस्थित होते. माजी आमदार सदाशिव पाटील यांच्यासह नागरीकांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवित सोहळा पाहिला.
विटा शहर कचराकुंडीमुक्त, कचरामुक्त, प्लास्टिकमुक्त आणि हागणदारीमुक्त आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशातील चार हजार ३२० शहरांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये विविध घटकांवरती शहराचे मूल्यांकन केले गेले. यामध्ये शहर स्वच्छता रहिवासी व्यापारी आणि सार्वजनिक भागाची नियमित स्वच्छता, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय स्वच्छता आणि व्यवस्थापन, डिजिटल सेवा सुविधा, शहराचे सुशोभीकरण, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, शहरातील विविध आस्थापना, नागरिकांचा सहभाग आणि जनजागृती, ३ आर प्रणाली, १०० टक्के कचरा वर्गीकरण, कलेक्शन आणि प्रोसेसिंग, होम कम्पोस्टिंग, नाले तलाव व्यवस्थापन आणि स्वच्छता अशा अनेक घटकांचा समावेश केला जातो. हे सर्व घटक शहराच्या सर्वांगीण विकासाला पोषक असून याद्वारे संपूर्ण शहराचा शाश्वत विकास होण्यास मदत होते.
शहराची देशात सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवड झाल्यानंतर विढ्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. शनिवारी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते विटा शहराला स्वच्छ शहराचा बहुमान प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, स्वच्छतेचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर तथा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह स्वच्छता कर्मचारी शांताबाई हत्तीकर उपस्थित होते. त्यांनी विटेकरांच्यावतीने हा सन्मान स्विकारला.
येथील नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात या सोहळ्याचे थेट प्रेक्षपण दाखवण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील, ज्येष्ठ नेते दत्तात्रय चोथे, गंगाधर लकडे, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, आरोग्य सभापती दहावीर शितोळे, माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांच्यासह “नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, सामाजिक संस्था, महिला नागरिक उपस्थित होते. विटा पालिकेच्या नावाचा उल्लेख होताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाटात जल्लोष केला. उपस्थित प्रत्येक विटेकर नागरीकांच्यासाठी हा गौरवाचा आणि सन्मानाचा सोहळा होता. दिल्लीतील पुरस्कार वितरण विट्यात पाहता आल्याने अनेकांना या सोहळ्याचे साक्षिदार होता आले.