सचिन भादुले / विटा
विटा शहर आणि परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर असल्याच्या चर्चेने खळबळ माजली आहे. यातील एका बिबट्याने रात्रीच्या अंधारात शेतात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने वनविभागासह प्रशासन दक्ष झाले आहे.
सध्या ऊस लागण, ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. गहू, हरभऱ्याला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र पाळी करावी लागते. अशातच शहरातील पानसे मळा, जाधववस्ती परिसरातील बिबट्याचा वावर असणारा व्हिडिओ वायरल झाल्याने खळबळ माजली आहे.
दरम्यान, जाधव वस्तीवर युवकावर बिबट्याने युवकावर हल्ला केल्याचे मात्र कुत्र्याने मध्ये धाव घेतल्याने युवक बचावल्याचे सांगण्यात येत आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या थरारक घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दुचाकीस्वार, शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळले आहे. याचा परिणाम पिकांवर होत आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. विट्यातील अनेक नागरिक सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी या भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असतात. मात्र बिबट्याच्या दहशतीच्या वातावरणाने रस्ता सकाळी ओस पडला होता.
अफवांवर विश्वास ठेवू नका – वनक्षेत्रपाल कांबळे
दरम्यान, याबाबत वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. आम्ही येथील नागरीकांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. दोन दिवसांपासून आम्ही या भागात आहोत. आत्तापर्यंत तरी बिबट्याच्या वावराचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. त्याच्या पावलाचे ठसे आढळून आले नाहीत. शिवाय बिबट्या हा प्रणी स्वस्थ बसणारा नाही. आत्तापर्यंत त्याने एखाद्या तरी जनावरावर हल्ला केला असता. मात्र असे काहीच आढळलेले नाही, असे सांगून नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनक्षेत्रपाल कांबळे यांनी केले आहे.








