मनसेच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाची कारवाई
प्रतिनिधी / विटा
विट्यात एका बंद पोल्ट्रीफार्ममध्ये अवैध धान्यसाठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर बुधवारी पुरवठा विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये धान्याची तब्बल 319 पोती आढळली आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष साजिद आगा आणि कृष्णा देशमुख यांनी केली आहे. दरम्यान याबाबत फिर्याद देण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, येथील कराड रस्त्यालगतच्या गोकुळ मंगल कार्यालय जवळच्या बंद पोल्ट्रीमध्ये धान्याची पोती असल्याची माहिती मनसेचे खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांना मिळाली. त्यांनी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना माहिती दिली. तहसीलदारांनी पुरवठा विभागाला थेट संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रभारी पुरवठा अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोल्ट्री फार्म मध्ये 319 धान्याची पोती आढळली. यात २२१ तांदळाची पोती आणि ९८ गव्हाच्या पोत्यांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.
सखोल चौकशी व्हावी – आगा
दरम्यान तालुक्यातील पुरवठा विभागाचे काही अधिकारी आणि संबंधित दुकानदार यांच्या संगनमताने हा प्रकार झाला असावा. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष साजिद आगा यांनी केली आहे. यावेळी तालुका सचिव कृष्णा देशमुख तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे, तालुका उपाध्यक्ष सुरज तांबोळी, तालुका वाहतूक सेना उपाध्यक्ष मिलिंद पवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गोडाऊन सील करून फिर्याद दाखल करण्याच्या सूचना – तहसीलदार
येथील कराड रोड लगत गोकुळ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये अवैध धान्यसाठा केलेबाबत प्राप्त तक्रारीनुसार पुरवठा निरीक्षक व प्रभारी नायब तहसीलदार यांनी पोलिसांसमवेत गोडाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी 221 तांदूळ पोती व गहू 98 पोती आढळून आली. संबंधित इसमाने या धान्य साठ्याबाबत कोणतीही कागदपत्र सादर केलेली नाहीत. त्यामुळे सदरचा धान्यसाठा अवैध असून काळा बाजार विक्रीच्या दृष्टीने आणल्याचे दिसून आले. संबधित गोडाऊन सील करून जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये फिर्याद दाखल करणे बाबत पुरवठा निरीक्षक यांचेमार्फत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.