कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / विटा
कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षी विट्याचा या ऐतिहासिक दसरा पालखी शर्यत सोहळा रद्द करण्यात आला आहे. साध्या पद्धतीने पालख्यांची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. दीडशे वर्षाच्या इतिहासात असा प्रसंग बहुधा पहिल्यांदाच आला असावा. याबाबतचा निर्णय प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.
विट्याच्या ऐतिहासिक दसरा पालखी शर्यती देशात प्रसिद्ध आहेत. या शर्यतींना दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. लाखोंच्या संख्येने लोक या ऐतिहासिक पालखी शर्यती पाहण्यासाठी उपस्थित रहात असतात. मुळस्थान आणि विट्याच्या मानाच्या पालख्यामध्ये ही शर्यत पार पडते. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या शर्यती यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले.
येथिल तहसिल कार्यालयात आगामी विजयादशमी दसरा पालखी शर्यत सोहळ्याच्या अनुषंगाने बैठकीचे करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके,पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह नाथ मंदिर आणि मूळस्थान, गुंफा, सुळेवाडी, रेवानगर येथिल नागरिक, मंदिरातील पुजारी, विश्वस्थ, ट्रस्ट पदाधिकारी, पालखी शर्यतीत सहभागी होणारे भाविक सदस्य उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंगचे पालन करून बैठक घेण्यात आली. मिटिंग मध्ये प्रशासनाच्यावतीने दसरा पालखी शर्यत सोहळा रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर नवरात्र उत्सव निमित्त नाथ मंदिरांमध्ये होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करणेबाबत आवाहन करण्यात आले होते.
त्या आवाहनाला माजी आमदार सदाभाऊ पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आणि मूळस्थान, गुंफा सुळेवाडी, रेवानगर येथील नागरिक, मंदिरातील पुजारी, पालखीचे मानकरी, ट्रस्टचे पदाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन चालू वर्षी सालाबाद प्रमाणे होणारा नवरात्र उत्सव तसेच दसरा पालखी शर्यत सोहळा कार्यक्रम साजरा न करता फक्त साधे पद्धतीने पालख्यांची विधीवत पूजा करण्यात येणार आहे. त्यामुळे विटा शहरात विजयादशमी दसऱ्याचे अनुषंगाने होणारा पालखी शर्यत सोहळा कार्यक्रम होणार नाही, असे जाहीर करण्यात आले. शासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वांना नवरात्री उत्सवाच्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देऊन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केले.
Previous Articleसोलापुरात विद्यापीठाच्या परीक्षांना अतिवृष्टीचा फटका; 16 रोजीच्या परीक्षा 18 ऑक्टोबरला होणार
Next Article सायकलवरून भारत भ्रमंती करणारा सातारचा अवलिया








