कुपवाड / प्रतिनिधी
कुपवाडमधील दि विटा मर्चंट बँकेकडे कर्जापोटी तारण असलेली प्रॉपर्टी बोजा नोंद करण्यापूर्वीच संगनमताने परस्पर विकुन कर्ज घेतलेल्या बँकेची तब्बल ३० लाखांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कर्जदार, जामिनदार, साक्षीदार व प्रॉपर्टी घेणाऱ्या नव्या मालकासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये संशयित कर्जदार अजयकुमार रसिकलाल मारू, त्याचे वडिल रसिकलाल खेरात मारू, आई रेखा रसिकलाल मारू (तिघे रा. संभाजीनगर, टिंबर एरिया, सांगली) व प्लॉट खरेदीदार जयवर्धन जयपाल बिरनाळे (मौजे डिग्रज), जामिनदार स्वप्निल जिनपाल चपणे (रा. कारखान्याजवळ, सांगली), संदीप बाबासाहेब हाक्के (रा. टिंबर एरिया), साक्षीदार कलगोंडा चवगोंडा पाटील (रा. नांद्रे), बसवराज अप्पासाहेब बिराजदार (रा. पद्माळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरिधात शाखाधिकारी प्रमोद बाळासाहेब पाटील यांनी फिर्याद दिली आहे.