बेळगाव : बेळगाव शहरातील हायस्कूलच्या विज्ञान शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा महाद्वार रोड येथील विज्ञान विकास हायस्कूलमध्ये नुकतीच उत्साहात पार पडली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एसएसएलसी नोडल अधिकारी परविन नदाफ उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक सुरेश कळ्ळेकर यांनी भूषविले.
प्रारंभी विज्ञान फोरमसाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून एस. एन. जोशी, सेक्रेटरी कीर्ती चिंचणीकर, खजिनदार एन. एस. के. यांची निवड करण्यात आली. यानंतर एसएसएलसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजनांवर चर्चा करण्यात आली. विविध प्रकारचे कार्यभार शिक्षकांवर सोपविण्याबरोबरच प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्या दृष्टिकोनातून आवश्यक तयारी या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. पुढील कार्यशाळा अनुक्रमे मराठी विद्यानिकेतन, ठळकवाडी हायस्कूल, बालिका आदर्श, आदर्श विद्यामंदिर येथे घेण्यात येतील, असे ठरविण्यात आले.









