प्रतिनिधी/ बेळगाव
कोविड-19 च्या संकटात एसएसएलसीचा टप्पा यशस्वी करण्यासाठी अचूक व्यवस्थापनाच्या माध्यमातून परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे. दि. 25 जून रोजी सुरू झालेल्या दहावी परीक्षेचा तिसरा अर्थात विज्ञान विषयाचा पेपर सोमवारी सुरळीतपणे पार पडला. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून तिसऱया पेपरला एकूण 766 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. यामुळे कोरोनाच्या संकटात नोंदणी केलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून परीक्षेला गैरहजर राहण्याचे प्रमाण इतर शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. विज्ञानच्या पेपरलाही बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपामुळे 15 मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात आला.
विज्ञान विषयाच्या पेपरला जिल्हय़ातून एकूण 31,294 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली तर 766 विद्यार्थी गैरहजर होते. दहावीचा तिसरा पेपर सुरळीतपणे पार पडल्याने एसएसएलसीचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. यावर्षी प्रथमच दहावीची परीक्षा द्वितीय भाषा विषयाच्या पेपरने सुरू झाली असून दरवर्षी भाषा पेपरनंतर कोअर विषय स्वरुपात पेपर पार पडतात. मात्र यंदा प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपाबरोबरच माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रकाच्या स्वरुपातही बदल केला आहे. मंगळवारच्या विश्रांतीनंतर सलग तीन पेपर पार पडणार आहेत. बुधवार दि. 1 जुलै रोजी समाजविज्ञान विषयाचा पेपर होणार आहे. गुरुवार दि. 2 जुलै रोजी प्रथम भाषा तर शुक्रवार दि. 3 जुलै रोजी तृतीय भाषा विषयाच्या पेपरने परीक्षेची समाप्ती होणार आहे.









