आपल्या जीवनात नको असलेली दु:खे व समस्या का येतात व त्यावर मात कशी करावी हे ज्ञान आजच्या आधुनिक विज्ञानाला नाही. मृत्यू झाला की सर्व काही संपले असा आपला गैरसमज आहे. यासाठी आजच्या तथाकथित प्रगत ज्ञानाच्या पलीकडे असलेले अध्यात्म ज्ञान याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. दुर्दैवाने अध्यात्म क्षेत्रामध्ये अंधश्रद्धा व भोंदुगिरी वाढल्याने या सर्वोच्च विज्ञानापासून आपण दूर जात आहोत. म्हणून या अध्यात्म ज्ञानाचा धर्म किंवा श्रद्धा यादृष्टीने विचार न करता विज्ञान म्हणून विचार करून समजून घेऊन, पालन करून, अनुभव घेतला पाहिजे. त्यासाठीच तर मनुष्याला बुद्धी दिली आहे.
आपल्या बुद्धीचा केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन या शारीरिक गरजा पुरविण्यातच आयुष्य कुत्र्या-मांजरासारखे वाया न घालवता आपण जन्म, मृत्यू, जरा, व्याधी व आयुष्यात येणाऱया अनेक समस्या यापासून कायमचे कसे मुक्त क्हावे हा विचार करण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. असा विचार पशू प्राणी, पक्षी करू शकत नाहीत. म्हणून या विज्ञानाबद्दल आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीकडून हे मार्गदर्शन आपण प्राप्त केले पाहिजे. संत तुकाराम महाराज हे या आधुनिक काळातील या आध्यात्मिक विज्ञानाचे अधिकारी आहेत, ते जे काही सांगतात त्याचा वैज्ञानिक दृष्टीने आपण विचार केला पाहिजे.
विज्ञान म्हणजे ज्ञान प्राप्त करून प्रयोगशाळेत त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज जे ज्ञान देत आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी प्रयोगशाळा म्हणजे आपले शरीर व आजूबाजूचा निसर्ग आहे. येथे कोणीही स्वत: अनुभव घेऊ शकतो. आपल्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत येणाऱया सर्व दु:खांचे मूळ कोठे आहे, हे सांगताना संत तुकाराम महाराज सांगतात, शरीर दु:खाचे कोठार। शरीर रोगाचे भांडार । शरीर दुर्गंधीची धार । नाही अपवित्र शरीर ऐसे ।। अर्थात शरीर हे दु:खाचे आणि रोगाचे भांडार आहे. शरीरापासून दुर्गंधी म्हणजे घाण वस्तू बाहेर पडतात म्हणून शरीरासारखे अपवित्र काही नाही.
सर्व रोग, दु:खे ही आपल्या शरीराला होतात. आपल्या शरीराला नऊ छिदे आहेत. ज्यातून मलमूत्र, शेंबूड, थुंकी, लाळ, केस, नखे, कान, डोळय़ातील मळ या घाण वस्तु बाहेर पडतात. शरीरामध्येसुद्धा हाडे, रक्त, मांस, पेशी आणि वर वर्णीलेल्या सर्व घाण वस्तू आहेत म्हणून शरीरासारखे घाण व अपवित्र काही नाही. मग हे शरीर आपल्याला का मिळाले आहे? शरीर कशापासून बनले आहे? याबद्दल वर्णन करताना तुकाराम महाराज सांगतात.
पंच महाभुताचा गोंधळ। केला एके ठायी मेळ। लाविला सबळ अहंकार त्यापाठी ।।1।।तेथे काय मी ते माझे। कोण वागवी ते ओझे । देहा केवी रिझे । हे काळाचे भातुके ।।2।। जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जिर्ण। संचित प्रमाण । भोग शुभा अशुभासी ।।3।। इच्छा वाढविते वेल । खुंटावा तो खरा बोल ।तुका म्हणे मोल । झांकले ते पावेल ।।4।। 1. भिन्न भिन्न पंचमहाभूते एका ठिकाणी मिळून देह तयार झालेला आहे पण मीच हे शरीर आहे हा अहंकार आपल्या मागे लागला आहे.निसर्ग हा पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या आठ तत्त्वांनी बनलेला आहे हे आपण पाहू व अनुभवू शकतो. आपले शरीरही याच पाच स्थूल म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश आणि मन, बुद्धी, अहंकार या तीन सूक्ष्म तत्त्वांनी बनलेले आहे.
2. देहाशी जिवात्माचा काहीही संबंध नाही. पण अज्ञानाने आपण शरीरालाच सर्वस्व मानतो. माझा हात, माझे पाय, माझे डोके, माझे शरीर असे म्हणताना माझे म्हणणारा ‘मी’ कोण आहे तो जिवात्मा या शरीराचे पालन करत राहतो पण काळाच्या प्रभावाखाली शरीर असल्याने बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था अशी स्थित्यंतरे करत मृत्युसमयी आपण शरीराचा त्याग करतो. आपल्या शरीरामध्ये उत्पत्ती, विकास, स्थिरता, प्रजनन, क्षय आणि विनाश ही शरीरात ‘आत्मा’ असल्याचा परिणाम आहे. सारांश, मृत्यू शरीराचा होतो, आत्मा सनातन आहे.
3. वास्तविक ‘आत्मा’ला जन्मही नाही व मरणही नाही. आपण ज्याप्रमाणे जुनी वस्त्रे टाकून नवी वस्त्रs धारण करतो त्याप्रमाणे निरनिराळय़ा इच्छा भोगण्यासाठी ‘आत्मा’ अनेक प्रकारची शरीरे प्राप्त करतो. आपल्यासमोर अशी उदाहरणे अनेक प्रकारचे शरीर, पशू, प्राणी, कीटक, जलचर, वृक्ष, वेली या स्वरुपात आपण दररोज पाहतो. पण प्रत्येक शरीरामध्ये त्याला पुनः पुन्हा जन्म, व्याधी, म्हातारपण शेवटी मृत्यू या दु:खद प्रसंगातून जावे लागते.
4. अनेक शरीरे बदलत, आपल्या अतृप्त इच्छा तृप्त करत आणि त्यांचे परिणाम म्हणून कायम दु:ख भोगत आपण तडफडत राहतो. म्हणून ज्ञानी व्यक्तीने हे दुष्टचक्र ओळखून सर्व दु:खाचे मूळ असलेली ‘इच्छा’ कमी करावी म्हणजे आपण शरीर नाही तर ‘आत्मा’ आहोत याचा अनुभव येईल.
थोडक्मयात सांगायचे तर ‘आत्मा’ जेव्हा शरीराच्या माध्यमातून अतृप्त इच्छा भोगण्याची सवय लावून घेतो तेव्हा तो इंद्रियाचा दास होतो व स्वत:चे अस्तित्व विसरून जातो. म्हणून ‘आत्मा’ ज्ञान जाणून घेऊन आपण कशा प्रकारे ‘इच्छा’ रहीत व्हावे हे मनुष्यजन्मातच आपण जाणून घेऊ शकतो व त्याप्रमाणे पालन केल्यास या जन्मांती सर्व दु:खापासून कायमचे मुक्त होऊ शकतो. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास हे सर्वांनाच शक्मय आहे. पुढे तुकाराम महाराज शरीराच्या सर्व दु:खातून कायमचे कसे मुक्त व्हावे याचा उपाय सांगत आहेत. तरीच जन्मा यावे। दास विठोबाचे व्हावे ।।1।। नाहीतरी काय थोडी । श्वान शुकरे बापुडी।।2।। जन्मल्याचे ते फळ । अंगी लागो नेदी मळ।।3।। तुका म्हणे भले । ज्याच्या नांवे मानवले ।।4।। विठोबाचे दास व्हायचे असेल तरच मनुष्य जन्मास यावे, नाहीतर डुकरे, कुत्री काय थोडी आहेत? मनुष्य जन्माला आल्यावर त्यांनी इंद्रियाचा दास न बनता विठोबाचे दास होण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ‘आत्मा’ या दृष्टीने आपला सर्व आत्म्यांचाही आत्मा (परमात्मा) याचा आपला सनातन संबंध आहे. विठ्ठलाच्या सेवेचा आपल्याला विसर पडला आहे आणि हेच आपल्या सर्व दु:खांचे कारण आहे. मनुष्य जन्मातच हे ज्ञान जाणून घेऊन आपली चूक सुधारण्याची संधी आपल्याला आहे. नाहीतर मनुष्य जन्माला येऊन पुन्हा आपल्याला दु:ख देणाऱया इंद्रियाच्या सेवेत रममाण झाल्यास आपल्यामध्ये आणि डुक्कर, कुत्री अशा हीन पशुमध्ये काय फरक आहे.
मनुष्य जन्माला आल्याचे सार्थक म्हणजे अंगाला सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा मळ लागू न देणे. या तीन गुणांमुळे निरनिराळय़ा इच्छांचा मळ आपल्याला म्हणजे ‘आत्मा’ला लागला आहे. म्हणून आपली चेतना मलीन झाली आहे आणि ही मलीन चेतना साफ करण्यासाठी विठोबाचे नामस्मरण जो करतो तोच धन्य आहे. सर्व इच्छा जेथून उत्पन्न होतात ते आहे मन. म्हणून या मनालाच मुक्त करण्याच्या उपायाला मंत्र म्हणतात. ‘मनस् त्रायते इति मंत्र:’ मन ज्यावेळी विठोबाचे नामस्मरण करते त्यावेळी सर्व इच्छांचा मळ साफ होतो व मन विठ्ठलाच्या सेवेत लागते. आपण ज्या कलियुगामध्ये राहतो आहोत त्या युगात ‘हरे कृष्ण, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । हरे राम हरे राम राम राम हरे हरे।।’ या महामंत्राचे नामस्मरण दररोज थोडा वेळ केल्याने आपले मलीन मन शांत व समाधानी होत असल्याचा आपल्याला थोडय़ा दिवसातच अनुभव येईल. जीवनामध्ये आपण सुखप्राप्तीसाठी काबाडकष्ट करतो पण आपल्याला शेवटी दु:खच प्राप्त होते. नामस्मरण करायला काहीही खर्च येत नाही, म्हणून प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? वर वर्णन केलेली माहिती ही केवळ या अध्यात्मज्ञानाची सुरुवात आहे. जागेअभावी सर्व ज्ञान एकाच वेळी देणे शक्मय नाही. तरी पण जे काही ज्ञान इथे वर्णन केले आहे व असे रहस्यमय ज्ञान आजच्या प्रगत विज्ञानालाही माहीत नाही म्हणून थोडीशी ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. शेवटी जाता जाता बुद्धिवंतांना, वैज्ञानिकांना, तसेच सर्व दु:खापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करणाऱया सर्वसामान्यांनी या ज्ञानाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा हे आवाहन.
वृंदावनदास








