छोटय़ा नौकेतून वल्हवत करताहेत जीवघेणी ये-जा
मालवण:
‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग किल्ला रहिवासी सलग अकरा दिवस अंधारात आहेत. मान्सूनच्या आगमनापूर्वी हा अंधार दूर व्हावा, याकरिता ते प्रसंगी काहीसा धोकादायक जलप्रवास करताना दिसत आहेत. देऊळवाडा येथील वीज वितरण कंपनी कार्यालयात विजेची समस्या मांडण्यासाठी किल्ला रहिवासी गुरुवारी एका छोटय़ा नौकेतून वल्हवत मालवणात आले. किल्ला ते बंदर जेटी असा साधारणत: दीड किमीचा जलप्रवास त्यांनी केला. विजेसाठी किल्लावासीयांची ही धडपड अंगावर काटा आणणारीच आहे.
16 मे रोजी झालेल्या चक्रीवादळानंतर समुद्रातील वादळी वातावरण पूर्णत: शांत झाले आहे, अशी परिस्थिती नाही. सिंधुदुर्ग किल्ला सभोवतालील समुद्र व मालवण बंदरातील खडकाळ भागात अद्यापही छोटय़ा-छोटय़ा लाटा तयार होतात. या लाटा बिगरयांत्रिक छोटय़ा नौकांना धोकादायक ठरू शकतात. तौक्ते चक्रीवादळात किल्ला रहिवाशांच्या नेहमीच्या वापरातील नौका वाहून गेल्या आहेत. त्यामुळे मालवणात पोहोचण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम सोमवारी मालवण मेढा येथील एका यंत्रनौकेस पाचारण केले. मालवणात पोहोचल्यावर त्यांनी देऊळवाडा येथे जाऊन वीज वितरण कंपनी कार्यालयातील अधिकाऱयांकडे आपली कैफियत मांडली. लवकरात लवकर किल्ल्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. परंतु, मालवणहून किल्ल्यात जाताना मात्र त्यांनी मेढा येथील एक छोटी नौका घेत वल्हवत सिंधुदुर्ग किल्ला गाठला.
गुरुवारी सकाळी पुन्हा किल्ला रहिवासी मंगेश सावंत, श्रीराम सकपाळ व अन्य एकजण मालवणात छोटी नौका घेऊन दाखल झाले. आज मात्र त्यांना वीज वितरणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. किल्ल्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची हमी त्यांना मिळाली. किल्ल्यातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे कळाल्याने ते सुखावून गेले. तरीपण किल्ल्यावर परतत असताना त्यांनी एक छोटासा जनरेटर आपल्यासोबत घेतला होता. शिवाय दोन सिलिंडर, माडाची झापे व अन्य जीवनावश्यक सामानही होते. शिवसेनेचे नगरसेवक मंदार केणी आणि आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर यांनी त्यांची भेट घेत त्यांना पाच ताडपत्र्या भेट दिल्या.
वीज खांब कोसळले, गतिमानता आवश्यक
सिंधुदुर्ग किल्ल्यावर दांडी समुद्र किनाऱयावरून येथून वीज कंपनीची टॉवरलाईन जाते. तौक्ते चक्रीवादळात यातील काही वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा गेले अकरा दिवस बंद आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी हा वीजपुरवठा सुरू होणे गरजेचे आहे. कारण मान्सून काळात पुन्हा समुद्र खवळला, तर वीज कंपनीला खांब उभे करण्याच्या मोहिमेत अडचणी येऊ शकतात. एकूणच विजेअभावी किल्लावासीयांचे होणारे हाल आणि छोटय़ा नौकेतून करावी लागणारी ये-जा थांबविण्यासाठी प्रशासनाने गतिमानता दाखविणे आवश्यक आहे.









