क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयओएस स्पोर्ट्स एंटरटेन्मेंटच्या सहकार्याने स्वेन एंटरटेन्मेंटने आशियातील सर्वात मोठय़ा आर्म रेसलिंग स्पर्धेचे म्हणजे प्रो पंजा लीगचे गोव्यात आयोजन केले आहे. ही लीग 19 मार्च रोजी होणार असून, या लीगचे सामने विजेंदर व आर्तिश लोपसन यांच्या मुख्य लढतीपूर्वी होतील. ही लढत गोव्यातील मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो शिपच्या टेरेसवर होणार आहे. विजेंदरची बॉक्सिंग लढत आणि त्यापूर्वी नामांकित आर्म रेसलर यांच्या आकर्षक लढतींचा थरार या निमित्ताने गोवेंकरांना बघायला मिळणार आहे.
प्रो पंजा लीगचे उद्घाटन 20 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर झाले. ‘प्रत्येक खेळ मोठा असतो. आर्म रेसलिंग हा सुद्धा एक क्रीडा प्रकार आहे. या खेळातून कमालीचे मनोरंजन होते. या खेळाचे आयोजन पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीत करता येऊ शकते व याला चांगले यश मिळेल असे विजेंदर सिंग म्हणाला. या लीगच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या सामन्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. त्यावेळी देशातील सर्वोत्तम खेळाडू आपल्या वजनी गटात सहभागी झाले होते. या पहिल्या टप्प्यात मुख्य मेगा बेल्टच्या लढतीत सुनीलकुमारने विजेत्या दिलशानला पराभूत केले. पहिल्या लीगमध्ये एकूण 9 लढती झाल्या. दिल्लीत झालेल्या या पहिल्या लीगमध्ये 90 किलो वजनी गटात विजेता सिद्धार्थ मलाकर या दुसऱया लीगमध्येही खेळणार आहे. त्याची लढत 100 किलो वजनी गटातील विजेत्या सुनीलकुमारशी होईल. यातील विजेत्यास ‘सुपर चँप‘ असा किताब देण्यात येईल. पहिल्या लीगमधील 65 किलो गटातील विजेता चेतन शर्मा हा पंजाबच्या दुसऱया मानांकित परमप्रीत कौर विरूद्ध लढेल.









