एक हजार 300 झाडांचे संवर्धन; देहदान, नेत्रदानाच्या चळवळीला पाठबळ
अरुण रोटे / सोलापूर
एक हजार 300 झाडांचे संवर्धन, देहदान, नेत्रदानाच्या चळवळीला पाठबळ, `घर तेथे झाडं’ अशी पर्यावरण संवर्धनाची चळवळ राबवणाऱया सोलापुरातल्या विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाच्या कार्याचा राज्यभरात गौरव झाला आहे. यंदाही कोरोनाविरुद्ध मोठी जनजागरण मोहीम मंडळाने राबविली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुणगौरव केलेल्या विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचा आलेख कायमच चढता राहिला आहे. राजकीय व्यासपीठाला दूर ठेवून सर्वसामान्यांना स्थान देउढन सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले हे मध्यवर्ती सर्वांच्या हक्काचे झाले आहे. मध्यवर्तीचे अध्यक्षपद महिलेला देऊन स्त्राr-पुरुष समानतेचा नारा देणारे हे राज्यातील पहिले महामंडळ ठरले.
दिवसेंदिवस वाढत जाणारे शहर. त्यातल्या त्यात विजापूर रोडला नागरिकांची पसंदी जास्त होती. लोकवस्ती वाढत होती. त्याकाळात म्हणजे 1985 मध्ये विजापूर रोड मध्यवर्ती महामंडळाची स्थापना विजय शाबादी आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. शहराला एक आमदार, तीन महापौर, दोन स्थायी समिती सभापती आणि 35 नगरसेवक देणाऱया विजापूर रोड मध्यवर्ती मंडळात आजमितीला 185 मंडळांचा समावेश आहे. सामाजिक उपक्रमाबरोबरच देखण्या मिरवणुकांसाठी मध्यवर्ती प्रसिद्ध आहे. पर्यावरणासाठी झटणाऱया विजापूर रोड मध्यवर्तीने आजपर्यंत एक हजार 300 झाडांचे संवर्धन केले. विशेष म्हणजे वृक्षलागवड आणि संवर्धन करणारे मंडळ म्हणून शहरपातळीवर याची नोंद घेण्यात आली.
देहदानाची चळवळ प्रत्यक्षात राबविणाऱया विजापूर रोड मध्यवर्तेच्या वतीने 35 देहदान व 120 जणांना नेत्रदानातून दृष्टी दिली. कोरोना संसर्गाशी दोन हात करणाऱया लसीचे डोस घेण्यासाठी लोकांचे समुपदेशन आणि लसीकरण कार्यक्रम मंडळाने यंदा हाती घेतला आहे. शिवाय लोकसंख्येचा महापूर थांबविण्यासाठी मुलगा किंवा मुलगी एकच पाल्य असा संदेशही मंडळाकडून समाजाला देण्याचे काम सुरू आहे. शिवाय नागरिकांच्या समस्या जाणून तो सोडविणाऱया व्यक्तीलाच मतदान करा, असे आवाहन करणाऱया माहिती पत्रकांचे वाटप मध्यवर्तीच्या माध्यमातून विविध मंडळाकडून केले जात आहे.
एक दाम्पत्य, एक अपत्य
वंशाचा दिवा म्हणून मुलाला प्राधान्य दिले जाते. अलीकडील काळात मुलगा किंवा मुलगी असे वेगळे पाहिले जात नाही. मुलीकडूनही आई-वडिलांचा सांभाळ करण्यात येतो. काळानुसार समाजातील चित्र पालटले आहे. यामुळे वंशाच्या दिव्यासाठी हट्ट न धरता `एक दाम्पत्य, एक अपत्य’ असा सुनिश्चय माता-पित्यांनी करावा. कोरोना महामारीत मंडळांनी सरकारच्या नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा.
– विजय शाबादी, संस्थापक, विजापूर रोड मध्यवर्ती मंडळ- सोलापूर फोटो-
घर तेथे झाड
`घर तेथे झाड’ ही संकल्पना प्रत्यक्षात राबविताना मंडळाने घराचा पाया खोदणाऱया प्रत्येक ठिकाणी रोप भेट दिले. त्यावर न थांबता मंडळाकडून वृक्षसंवर्धनासाठी संबंधितांना विनंती केली जाते. पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या मंडळाकडून अनेक लोकोपयोगी कामे केली गेली आहेत.









