प्रतिनिधी/वार्ताहर
संकेश्वर/कुडची
गुरुवारी विजापूर, कुडची, येळ्ळूर, संकेश्वर, हिरेबागेवाडी याठिकाणी नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. गुरुवारी बेळगाव जिह्यात तब्बल 17 नवे रुग्ण आढळल्याने जिह्यावर कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. स्वॅबच्या चाचणीचा अहवाल उशिरा मिळत असल्याने आणखी किती रुग्ण वाढणार? अशी भीती जिह्यातील प्रमुख शहरांमध्ये निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमिवर जिल्हा प्रशासनाकडून तबलीग कार्यक्रमाहून परतलेल्यांचा पुन्हा एकदा नव्याने शोध घेण्याची मोहिम उघडण्यात आली आहे. दररोज नव्याने आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे जिह्यात लॉकडाऊनचे निर्बंध आणखीन तीव्र करण्यात करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
कोरोना रुग्ण आढळून कुडची शहरात आशा कार्यकर्त्यांच्यामार्फत घरोघरी फिरुन नागरिकांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आला. गुरुवारी कुडची येथील आणखी 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची तीव्रता आणखी कडक करण्यात आली असून, नागरिकांना घरीच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रविवार दि. 5 रोजी मरकजहून परलेल्या चौघांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यात भर पडताना रविवार 12 व सोमवार 13 रोजी प्रत्येकी तीन रुग्णांची भर पडताना शहरातील आकडा 10 वर पोहचला आहे. यात भर पडताना गुरुवारी आणखी तब्बल 7 जणांना लागण झाल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनासमोर कोरोना बाधितांची संख्या आणखी किती वाढणार? अशी भीती निर्माण झाली आहे.
कुडचीतील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्हा आणि तालुका प्रशासनाबरोबरच स्थानिक प्रशासनानेही कंबर कसली आहे. असे असले तरी नागरिकांत मात्र वाढती संख्या धास्ती निर्माण करणारी ठरत आहे. घरोघरी थर्मल स्कॅनिंग, आशा कार्यकर्त्यांकडून तपासणी, चौकाचौकात पोलीस बंदोबस्त, मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी, क्वारंटाईनवर देखरेख आणि त्यांची तपासणी यासह अनेक पातळीवर प्रशासन जोमाने काम करत आहे.
दक्षिण दिल्लीतील निजामुद्दीन येथे धर्मसभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून परतलेल्या संकेश्वर निडसोशी रोड येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्वॅबच्या आलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. हे वृत्त वाऱयासारखे शहरात पसरताच संपूर्ण शहरच हादरले आहे. पोलीस व नगरपरिषदेच्या यंत्रणांनी गुरुवारी सकाळी 12 वाजताच नुराणी मशिदीसह हा परिसरच काबीज करून तातडीने या गल्लीत सॅनिटायझरचा फवारा करण्यासह सीलडाऊन केले आहे.
बेळगाव जिल्हय़ात कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला असतानाच संकेश्वर शहरात बुधवारपर्यंत एकही रुग्ण नव्हता. पण 16 रोजी सकाळी एका तबलिग कार्यक्रमातून परतलेल्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असून कोरोनाच्या भीतीचे सावट अधिकच गडद झाले आहे. रायबाग तालुक्यातील कुडचीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने थैमान घालत असतानाच संकेश्वरातील एका रुग्णाची भर पडल्याने जिल्हय़ातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून आले. जिल्हय़ाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब ठरली असून पोलीस, नगरपरिषद व आरोग्य विभागाने कंबर कसली असतानाही कोरोना पॉझीटीव्ह आढळल्याने प्रशासन हताश बनले आहे.
नुरानी मशिदीत आश्रय
कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह आढळलेल्याचे वय सुमारे 50 वर्षाचे आहे. सदर इसम 13 मार्च रोजी तबलिगचा कार्यक्रम आटोपून संकेश्वरात परतला होता. त्यानंतर तो मुक्तपणे सर्वत्र फिरत होता. ज्यावेळी राज्यभरात व विशेष करून बेळगाव जिल्हय़ात तबलिगहून परतलेल्याची प्रशासनाकडून कसून चौकशी सुरु करण्यात आली, यावेळी त्याने नुरानी मशिदीत लपून राहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती उजेडात येताच पोलीस व आरोग्य खात्याने सदर इसमाला मशिदीतून ताब्यात घेत, त्यांची संकेश्वर समुदाय आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून क्वारंटाईनसाठी त्याला बेळगावच्या सिव्हील इस्पितळात दाखल केले होते. याचवेळी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. गुरुवारी आलेल्या अहवालात तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही माहिती शहरासाठी धक्का देणारी बाब ठरली आहे.









