अर्केरी तांडानजीक घटना : दोघेजण गंभीर जखमी : मिनी गुड्सची ट्रकला समोरून धडक
वार्ताहर /विजापूर
मिनी गुड्स वाहनाची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना शुक्रवार दि. 16 रोजी अर्केरी तांडाजवळ राष्ट्रीय महामार्ग 50 वर घडली. सदर मृत व्यक्ती मिनी गुड्स वाहनाने लोणी बी. के. येथून विजापूरकडे येत होते. त्यावेळी हा भीषण अपघात घडला. श्रीशैल मेत्री, बुद्धय्या हिरेमठ (वय 45), पिंटू हिरेमठ (वय 21) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी, मिनी गुड्स वाहनातून श्रीशैल, बुद्धय्या व पिंटू व इतर लोणी बी. के. येथून विजापूरकडे राष्ट्रीय महामार्गावरून येत होते. दरम्यान, त्यांचे वाहन अर्केरी तांडाजवळ आले असता मिनी गुड्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे या वाहनाने समोरुन येणाऱया ट्रकला (क्र. एपी/29/टीए/6559) धडक दिली. यात श्रीशैल व बुद्धय्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघे जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर महामार्गावरून प्रवास करणारे प्रवाशी व स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेला पाचारण करून विजापूर सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पिंटूचा मृत्यू झाला असून अन्य तिघांवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पीएसआय संगमेश पळभावी यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यानंतर विजापूर सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. महामार्गावर अपघात घडल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन एकेरी मार्गाने वाहतूक सुरळीत केली.
यानंतर पेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.









