कोरोनाबाधितांची संख्या 35 वर, दोघांचा यापूर्वीच मृत्यू
प्रतिनिधी/ विजापूर
कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ विजापूरकरांसाठी चिंता वाढवणारी ठरते आहे. आज कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे. आजवर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.
20 रोजी एकाच दिवशी विजापुरात 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर कालपासून प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने लॉकडाऊन जिल्हय़ात अधिक कडक केला आहे. निर्बंध कडक करण्यासाठी पोलीस पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. पोलिसांनी 80 जणांना ताब्यात घेऊन त्यांना गव्हर्न्मेंट स्कूलमध्ये ठेवले आहे. त्यांची पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना सोडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 35 रुग्ण आढळलेली छप्परबंद गल्ली गोलगुंबज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून हा संपूर्ण भाग सीलबंद केला आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. गल्लोगल्लीत सॅनिटायझरने फवारणी करून स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. कोरोनाबाधित व्यक्तिंबरोबर संपर्कात आलेल्या सिंदगीतील नातेवाईकांचा तपास करण्यात येत आहे. यासाठी 125 डॉक्टरांचे पथक तपास करते आहे. छप्पर बंद कॉलनी, पैलवान गल्ली, सुभाष कॉलनी, हकीम चौक, झेंडा कट्टासह इतर ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.









