नवी दिल्ली
विजय मल्ल्या स्वतःच्या याचिकांवर निर्णय झाला नसल्याचा दाखला देत अन्य न्यायालयांचा निर्णय रोखू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली आहे. स्टेट बँकेसह अन्य बँकांनी लंडनच्या न्यायालयात मल्ल्याच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती. लंडन येथील न्यायालयाने याप्रकरणी निर्णय राखून ठेवला आहे.
मल्ल्या यांनी कर्ज फेडण्याच्या प्रस्तावासह 27 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचबरोबर लंडन येथील न्यायालयातही धाव घेत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दिवाळखोरीच्या प्रक्रियेसंबंधी आदेश दिला जाऊ नये अशी मागणी मल्ल्या यांनी केली होती.
किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाप्रकरणी मल्ल्या यांच्यावर फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हे नोंद आहेत. मार्च 2016 मध्ये त्यांनी लंडन येथे पलायन केले होते. लंडनचे न्यायालय आणि ब्रिटनच्या सरकारने मल्ल्यांच्या भारतातील प्रत्यार्पणाला मंजुरी दिली असून या निर्णयाच्या विरोधात त्यांनी दाद मागितली आहे. त्यांच्या यासंबंधीच्या याचिकेवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे.









