दुसऱया वनडेत द.आफ्रिकेवर 7 गडय़ांनी मात, सामनावीर श्रेयसचे नाबाद शतक
वृत्तसंस्था/ रांची
सामनावीर श्रेयस अय्यरचे नाबाद शतक, इशान किशनची अर्धशतकी खेळी आणि सिराजची भेदक गोलंदाजी यांच्या बळावर भारताने येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 25 चेंडू बाकी ठेवत 7 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना दिल्लीमध्ये मंगळवारी 11 रोजी होणार आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करणाऱया दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 278 धावांवर रोखले. ऐडन मॅरक्रम व रीझा हेन्ड्रिक्स यांनी अर्धशतके नोंदवली. त्यानंतर दोन गडी लवकर बाद झाले असले तरी इशान किशन व श्रेयस अय्यर यांच्या दमदार दीडशतकी भागीदारीमुळे भारताने 46 व्या षटकांत विजय साकार केला. भारताने 45.5 षटकांत 3 बाद 282 धावा जमविल्या. या मालिकेतील पहिला सामना द.आफ्रिकेने जिंकला होता.

दीडशतकी भागीदारी
279 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार शिखर धवन (20 चेंडूत 1 षटकारासह 13) व शुभमन गिल (26 चेंडूत 4 चौकारांसह 28) नवव्या षटकापर्यंत तंबूत परतले होते. पण इशान किशन व श्रेयस यांनी द.आफ्रिकेच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत तिसऱया गडय़ासाठी दीडशतकी भागीदारी करीत डाव सावरला आणि संघाला विजयाची संधीही निर्माण करून दिली. सावध प्रारंभ केल्यानंतर हळूहळू आक्रमक धोरण अवलंबत या दोघांनी 161 धावांची भागीदारी केली. 209 धावावर इशान किशन उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याचे शतक केवळ 7 धावांनी हुकले. त्याने 84 चेंडूत 4 चौकार, 7 षटकारांच्या मदतीने 93 धावा फटकावल्या. श्रेयसने नंतर संजू सॅमसनच्या साथीने चौथ्या गडय़ासाठी अभेद्य 73 धावांची भागीदारी करीत 46 व्या षटकांत संघाला विजय मिळवून दिला. श्रेयसने नॉर्त्झेला विजयी चौकार मारला. त्याने 111 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा फटकावल्या. त्याचे हे दुसरे वनडे शतक आहे तर सॅमसन 36 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह 29 धावांवर नाबाद राहिला. फॉर्च्युइन, पार्नेल व रबाडा यांनी एकेक गडी बाद केला.
हेन्ड्रिक्स-मॅरक्रम यांची अर्धशतके
द.आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर डी कॉक (5) व जानेमन मलान (25) स्वस्तात बाद झाल्यानंतर हेन्ड्रिक्स व मॅरक्रम यांनी डाव सावरताना शानदार अर्धशतके नोंदवली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 129 धावांची शतकी भागीदारी केली. सिराजने ही जोडी फोडताना हेन्ड्रिक्सला शाहबाज अहमदकरवी झेलबाद केले. हेन्ड्रिक्सने 76 चेंडूत 9 चौकार, 1 षटकारासह 74 धावा जमविल्या.
नंतर कुलदीपच्या गोलंदाजीवर सिराजने धोकादायक ठरू पाहणाऱया हेन्रिच क्लासेनचा (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 30) पुढे धावत जात अप्रतिम झेल टिपला. सिराजने स्लोअरवनचा हुशारीने वापर करीत अचूक मारा केल्याने फॉर्ममध्ये असलेल्या मिलरलाही (34 चेंडूत 35) फारशी फटकेबाजी करता आली नाही. त्याने 50 व्या षटकांत केवळ 3 धावा दिल्या आणि 10 षटकांत 38 धावा देत 3 बळी टिपले. 3 बाद 169 नंतर द.आफ्रिकेने तीन झटपट बळी गमविले. डेथ ओव्हर्समध्ये मिलरलाही फटकेबाजीसाठी संघर्ष करावा लागला. भारताचा अचूक मारा व क्षेत्ररक्षणामुळे शेवटच्या 10 षटकांत द.आफ्रिकेला केवळ 57 धावा जमविता आल्या.
तिसऱयाच षटकांत सिराजने डी कॉकला बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. नंतर पदार्पणवीर शाहबाज अहमदने मलानला (31 चेंडूत 25) पायचीत करून पहिला आंतरराष्ट्रीय बळी मिळविला. 10 षटकांत द.आफ्रिकेने 2 बाद 40 धावा जमविल्या होत्या. त्यात केवळ 7 चौकारांचा समावेश होता. पण मध्यफळीत हेन्ड्रिक्स व मॅरक्रम यांनी समयोचित फलंदाजी करीत शतकी भागीदारी नोंदवली. सावध फलंदाजी करीत त्यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. 20 व्या षटकानंतर त्यांनी धावांची गती वाढविली आणि प्रत्येक षटकात चौकार नोंदवत दोघांनी आपापली अर्धशतकेही पूर्ण केली. हेन्ड्रिक्सने 58 तर मॅरक्रमने 64 चेंडूत आपली अर्धशतके गाठली. सिराजने हेन्ड्रिक्सला बाद करून त्याची खेळी संपुष्टात आणली तर मॅरक्रमला वॉशिंग्टन सुंदरने बाद केले. मॅरक्रमने 89 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 79 धावा जमविल्या. नंतर धवनच्या नेतृत्वातील चलाखीमुळे भारताने 46 धावांत 3 बळी मिळवित द.आफ्रिकेला पावणेतीनशेच्या जवळपास रोखण्यात यश मिळविले. सिराजने 3 तर सुंदर, शाहबाझ, कुलदीप व शार्दुल ठाकुर यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः द.आफ्रिका 50 षटकांत 7 बाद 278 ः डी कॉक 5, मलान 25 (31 चेंडूत 4 चौकार), हेन्ड्रिक्स 74 (76 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), मॅरक्रम 79 (89 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), क्लासेन 30 (26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), डेव्हिड मिलर 35 (34 चेंडूत 4 चौकार), पार्नेल 16, केशव महाराज 5, अवांतर 9. गोलंदाजी ः सिराज 3-38, सुंदर 1-60, शाहबाज अहमद 1-54, कुलदीप यादव 1-49, शार्दुल ठाकुर 1-36.
भारत 45.5 षटकांत 3 बाद 282 ः धवन 13 (20 चेंडूत 1 षटकार), शुभमन गिल 28 (26 चेंडूत 5 चौकार), इशान किशन 93 (84 चेंडूत 4 चौकार, 7 षटकार), श्रेयस अय्यर नाबाद 113 (111 चेंडूत 15 चौकार), सॅमसन नाबाद 29 (36 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 6. गोलंदाजी ः फॉर्च्युइन 1-52, पार्नेल 1-43, रबाडा 1-59.









