काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर विरोधी आघाडी ‘इंडिया’चा पंतप्रधान ठरवला जाईल. 2024 च्या निवडणुकीच्या रिंगणात विजयी होणारी ‘इंडिया’ आघाडीचे सर्व खासदार पंतप्रधान निवडतील, असे काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले. तसेच भाजप नेत्या स्मृती इराणी अमेठीची जागा गमावतील असा दावाही काँग्रेस नेत्याने केला. 2024 मध्ये अमेठीची जनता स्मृती इराणींचा पराभव करतील. काँग्रेस किंवा ‘इंडिया’ आघाडीचा उमेदवार नक्कीच जिंकेल, असे ते पुढे म्हणाले.
‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. यामध्ये 26 पक्षांचे सुमारे 80 नेते सहभागी होण्याची शक्मयता आहे. मुंबईच्या बैठकीत ‘इंडिया’ आघाडीचा लोगो जारी केला जाऊ शकतो. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली. दुसरी बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळूर येथे झाली. मात्र, आतापर्यंत ‘इंडिया’ आघाडीने पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय पातळीवर जोरात सुरू आहे. अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 ते 2019 पर्यंत राहुल गांधी हे अमेठीचे सर्वाधिक काळ खासदार राहिले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी त्यांचा 55,120 मतांनी पराभव केला. 2019 मध्ये स्मृती इराणी पहिल्यांदा अमेठीतून खासदार म्हणून निवडून आल्या. राहुल गांधींना आधीच पराभवाची भीती वाटत असल्यामुळे त्यांनी केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती. वायनाडमधून विजयी होऊन राहुल खासदार झाले. आता ते पुन्हा 2024 मध्ये अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची वातावरणनिर्मिती सुरू आहे.