प्रतिनिधी /बेळगाव
लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रात पाणीपुरवठा करणाऱया हिंडलगा पंपिंगस्टेशनच्या जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणात गळती लागली आहे. विजयनगरजवळ लागलेल्या गळतीद्वारे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. तसेच शहरातील विविध भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. त्यामुळे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात आले.
राकसकोप जलाशयातून हिंडलगा पंपहाऊसमध्ये पाणीपुरवठा होतो. त्याठिकाणाहून जलशुद्धीकरण केंद्रात पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. पण या जलवाहिनीला लहान प्रमाणात गळती लागली होती. पण मंगळवारी गळतीचे प्रमाण वाढल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण झाला. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने बुधवारी सकाळी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. 2006 मध्ये पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले होते. त्यावेळी हिंडलगा पंपहाऊसपासून लक्ष्मी टेकडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन जलवाहिनी घालण्यात आली होती. त्या जलवाहिनीलाच गळती लागली असून दुरुस्तीसाठी एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. जलवाहिनीशेजारील चरी खोदून पाहणी करण्यात आली. पण दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू झाले नव्हते. दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम वाढल्यास शहरात पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. पण ऐन दसरोत्सवाच्या प्रारंभीच पाणीपुरवठा खंडित झाल्याने समस्या निर्माण झाली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









