राज्यपाल पिल्लई यांचे मत , प्रवासी साहित्य महोत्सवाचे उद्घाटन
प्रतिनिधी/ पणजी
कला आणि साहित्य या गोष्टी देशातील एकता आणि अखंडता सुनिश्चित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, असे ठाम मत राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केले.
शनिवारी पणजीत आयोजित देशातील पहिल्या प्रवासी साहित्य महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गोवा मनोरंजन संस्थेच्या मॅकनिज पॅलेस सभागृहात आयोजित कार्यक्रमास त्यांच्यासोबत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष विवेक देबरॉय, प्रसिद्ध चित्रपट निर्माते राहुल रवैल आणि महोत्सवाचे संस्थापक सुमंत बत्रा यांची उपस्थिती होती.
संवादाच्या तत्त्वज्ञानातील अविभाज्य घटक म्हणून डॉ. पिल्लई यांनी आपल्या बोलण्यातून भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. भाषेचा एकमेव उद्देश म्हणजे विचार व्यक्त करणे हा आहे. दिवंगत समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचेही तेच मत होते. म्हणूनच त्यांनी 1946 मध्ये गोव्यात पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीविरुद्ध क्रांतीची बीजे पेरताना, तुम्ही हृदयाची भाषा निवडावी, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता, असे पिल्लई म्हणाले.
महोत्सवाचे संस्थापक सुमंत बत्रा यांनी आपल्या भाषणात, गोवा हे एक असे स्थळ आहे जेथे आजही लोक वाचन, कुटुंबासोबत रमणे, कार्यक्रमांना उपस्थित राहणे, यासाठी वेळ काढतात. गोव्याची स्वतःची अशी समृद्ध भाषा आहे, ज्यामध्ये मोठे साहित्य लिहिले गेले आहे आणि या साहित्याची नक्कीच गरज आहे. तसेच लोकांना हे साहित्य वाचता यावे म्हणून ते अधिकाधिक अनुवादित करण्यात आले पाहिजे, असे सांगितले.
त्याचबरोबर तरुणांनी मोबाईल फोनचे सततचे वेड सोडून वाचनाची सवय पुन्हा विकसित करावी, असे आवाहन करताना त्यांनी गोव्यात आपण ‘भारतीय सिनेमा वारसा फाऊंडेशनची’ स्थापना करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे सांगितले. लोकांना एकत्र आणून चर्चा करण्यासाठी, साहित्य व कलेच्या इतर भागांचा विचार करण्यासाठी तसेच या देशाच्या सॉफ्टपॉवरच्या उभारणीसाठी प्रयत्न करीत योगदान देण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे ते पुढे म्हणाले. प्रवासी साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी गोवा हे उत्तराखंडच्या बाहेर सर्वात योग्य ठिकाण आहे, असेही त्यांनी सांगितले.
या महोत्सवाने गेल्या काही वर्षांमध्ये भारतभर आपला ठसा उमटवला आहे. सॉफ्टपॉवर हे तत्त्व संस्कृतीच्या कल्पनेशी जोडलेले आहे. संस्कृतीसाठी एक शब्द ’संस्कृत’ असेल. संस्कृत ही एक भाषा आहे ज्यात मला विशेष रस आहे. त्यासाठीच मी येथे आलो आहे, असे विवेक देबरॉय यांनी सांगितले.









