प्रतिनिधी /बेळगाव
विघ्नहर्ता स्पोर्टस क्लब देसुर आयोजित प्रकाशझोतातील व्हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उप्पीन ब्रदर्स संघाने ओलमनी संघाचा 2-1 असा पराभव करुन विघ्नहर्ता चषक पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू- प्रशांत माळी तर उत्कृष्ट स्मॅशर- चेतन पाटील याना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
देसुर विघ्नहर्ता क्लब आयोजित या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मृणाल हेब्बाळकर, भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. स्पर्धेत 30 संघानी भाग घेतला. या वेळी मंडळाच्या वतीने 13 निवृत जवानांचा खास गौरव करण्यात आले.
पहिल्या उपांत्य फेरीत उप्पीन ब्रदर्स संघाने बेनवाड संघाचा 25-19, 19-25, 15-12 तर दुसऱया उपांत्य फेरीत ओलमनी संघाने इदलहोंड संघाचा 25-20.25-18 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत उप्पीन ब्रदर्स संघाने ओलमनी संघाचा 25-18,19-25, 15-10 अशा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद मिळविले. बक्षिस वितरण विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब सभासदांच्या हस्ते विजेत्या उप्पीन ब्रदर्स संघाला 15 हजार रुपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या ओलमनी संघाला 7.501 रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू प्रशांत माळी (उप्पीन ब्रदर्स), उत्कृष्ट स्मॅशर चेतन पाटील (बेनवाड) यांना गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून रवि गुरव, भैरु बजंत्री, जोतीबा पाटील, संदिप पाटील यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विघ्नहर्ता स्पोटर्स क्लबच्या पदाधिकाऱयानी विशेष परिश्रम घेतले.









