उषा खन्ना यांना ‘एस.डी.बर्मन’पुरस्कार : महोत्सव डॉ. श्रीराम लागूंना समर्पित
पुणे / प्रतिनिधी :
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेल्या बी. पी. सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना 18 व्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘पिफ डिस्टिंग्विश्ड ऍवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल ऍवॉर्ड फॉर क्रिएटिव्ह म्युझिक ऍण्ड साऊंड’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या वषीचा पिफ महोत्सव दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात येणार असून महोत्सवाच्या प्रमुख प्रवेशद्वारास डॉ. लागू यांचे नाव देण्यात येणार आहे, तसेच लागू यांचे काही निवडक चित्रपटदेखील महोत्सवात पाहायला मिळतील.
महोत्सवाचे येत्या 9 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून, यावेळी बी. पी. सिंग, विक्रम गोखले आणि उषा खन्ना यांना वरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी सीआयडी या मालिकेत भूमिका साकारलेले अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे यांची खास उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटीनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ एनएफएआयमध्ये दाखविला जाणार आहे.
या वेळी मराठी स्पर्धात्मक चित्रपटांच्या नावांची घोषणादेखील करण्यात आली. या विभागात या वषी 60 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यातून ‘तुझ्या आईला (शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते), ‘चिवटी’, ‘वाय’, ‘फोटो प्रेम’, ‘स्माईल प्लीज’, ‘बोन्साई’, ‘आनंदी गोपाळ’ या सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.









