ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने महाराष्ट्रात उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले. 7358 रुग्ण मुंबई मनपा क्षेत्रातील असून एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.आतापर्यंत 26997 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिली.
पुढे ते म्हणाले, मागील चोवीस तासात महाराष्ट्रात 2682 नविन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 62 हजार 228 झाली आहे. यापैकी बरे झालेले रुग्ण वजा केल्यास सध्या महाराष्ट्रात 33,124 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात काल एका दिवसात कोरोनामुळे 116 रुग्णांनी आपला जीव गमावला. यामध्ये 77 पुरुष आणि 39 महिलांचा समावेश आहे. तर आता पर्यंत राज्यात कोरोनामुळे एकूण 2098 लोकांचा मृत्यू झाला आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 4 लाख 33 हजार 557 नमुन्यांपैकी 62 हजार 228 जण पॉझिटिव आहेत. सध्या राज्यात 5 लाख 35 हजार 467 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 35 हजार 967 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 43.38 टक्के एवढे आहे. तर राज्यातील मृत्युदर 3.37 टक्के आहे.









