वाहतुकीची कोंडी, कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
विकेंडमुळे दोन दिवस बंद असलेल्या बाजारपेठेत सोमवारी खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे दोन दिवस थांबलेली उलाढाल पूर्वपदावर आल्याचे दिसत आहे. मागील आठवडय़ापासून विकेंड काळात बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. मात्र विकेंडचा कालावधी संपताच सोमवारी बाजारपेठेत गर्दी होत आहे.
शहरातील नरगुंदकर भावे चौक, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, काकतीवेस, शनिवारखूट आदी भागात नागरिकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचीदेखील पायमल्ली होताना दिसत आहे. शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी विकेंड लागू केला आहे. मात्र विकेंडचा काळ संपताच होणारी गर्दी कोरोनाच्या दृष्टिकोनातून चिंतादायक आहे. विकेंड काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा असली तरी नागरिक पाठ फिरवत आहेत. दरम्यान, काही मोजके व्यापारी दुकाने खुली करत असले तरी ग्राहकांअभावी त्यांना प्रतीक्षेत रहावे लागत आहे. मात्र रविवार उलटताच सोमवारी बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
बाजारपेठेत सोमवारी गर्दी वाढल्याने फोर्ट रोड, कर्नाटक चौक, कलमठरोड आदी ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. वाहनधारकांना कसरत करत या कोंडीतून बाहेर पडावे लागले. विकेंड काळात नागरिकांबरोबर वाहनांची संख्यादेखील रोडावत आहे. मात्र सोमवारी सकाळपासूनच बाजारात वाहनांची संख्या वाढत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.









