मास्क न वापरणाऱया नागरिकांवर मनपा कर्मचाऱयांकडून कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने प्रशासनाने शनिवार-रविवार विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शहरातील खडेबाजार, गणपत गल्ली, मारूती गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड कडोलकर गल्ली यासह रविवारपेठमध्ये गर्दी झाली होती.
प्रशासनाने विकेंड कर्फ्यू काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा दिली असली तरी विकेंड कर्फ्यूच्या धास्तीने नागरिकांची शुक्रवारीच खरेदीसाठी लगबग दिसून आली. त्यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा देखील उडालेला पहायला मिळाला. बाजारपेठेतील किराणा, दूध, भाजी, फळे, आणि मांस विक्रीला विकेंड कर्फ्यू काळात मुभा राहणार आहे. मात्र नागरिकांनी शुक्रवारीच भाजीपाला खरेदीसाठीही गर्दी केली होती.
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्हय़ातील प्रमुख मंदिरांसह गर्दी होणाऱया ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. शिवाय खबरदारी म्हणून शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत विकेंड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. या काळात जीवनावश्यक गोष्टींना मुभा देण्यात आली असली तरी शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली.
मनपामार्फत जनजागृती
महानगरपालिकेच्या कर्मचाऱयांनी शुक्रवारी बाजारपेठेत जनजागृती करून मास्क न वापरणाऱया नागरिकांवर कारवाई केली. शुक्रवारी विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी झाली होती. दरम्यान अनेक नागरिक मास्कविना फिरताना दिसत होते. यावेळी मनपा कर्मचाऱयांनी स्पीकरद्वारे मास्क घालण्याच्या सूचना केल्या.
कलमठरोडवर वाहतुकीची कोंडी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शनिवार आणि रविवार विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली. तसेच अवजड वाहनांची देखील वर्दळ वाढल्याने कलमठरोडवर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत यातून बाहेर पडावे लागले.









