प्रवाशांची पाठ, परिवहनला फटका : आज बससेवा होणार सुरळीत
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने शासनाने नाईट-विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. रविवारी विकेंड कर्फ्यूच्या दुसऱया दिवशी देखील प्रवाशांचा प्रतिसाद थंडावलेला पहायला मिळाला. शिवाय नेहमी हजारो प्रवाशांनी गजबजलेले बसस्थानक सुनेसुने झाले होते. परिवहनने विकेंड कर्फ्यूच्या काळात बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र नागरिक घराबाहेर पडले नसल्याने बससेवेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस बससेवा ठप्प झाली. परिणामी परिवहन मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने विकेंड कर्फ्यू जारी केला असून याला देखील नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. कोरोनाला हरविण्यासाठी जनतेनेही विकेंड कर्फ्यूला पाळत घरी बसणेच पसंत केल्याने शहरासह बसस्थानकात शुकशुकाट पसरला होता. परिवहन मंडळाने विकेंड कर्फ्यूच्या काळात बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरिक घराबाहेर न पडल्याने बससेवेला थंडाच प्रतिसाद मिळाला. स्थानिक बसेससह लांबपल्ल्याच्या बसेस आगारात थांबून राहिल्याचे चित्र पहायला मिळाले.
बेळगाव आगारातून दरारोज स्थानिक बसेससह लांबपल्ल्यासाठी धावणारी बसची संख्या अधिक आहे. शिवाय महाराष्ट्र धावणाऱया बसची संख्या जास्त आहे. मात्र महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे बेळगाव आगाराला देखील फटका बसला आहे. बेळगाव आगारातील रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारातून दररोज हजारो बसची वर्दळ असते. मात्र विकेंड कर्फ्यूमुळे सर्वच आगारातील बसची वर्दळ थंडावली होती. परिवहनला कोरोनाचा फटका बसला आहे. शिवाय कर्मचाऱयांचा संपाचा देखील तोटा सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढत परिवहन उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत असताना पुन्हा कोरोनाने हाहाकार माजविल्याने परिवहन अडचणीत आले आहे.
आज बससेवा सुरू
शनिवारी व रविवार विकेंड कर्फ्यूमुळे ठप्प झालेली बससेवा सोमवारी सुरळीत सुरू होणार आहे. शिवाय ग्रामीण व लांबपल्ल्यासाठी विविध मार्गावर बस धावणार आहेत.









