प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड कर्फ्यू काळात काही ठराविक व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. वास्तविक ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रात्री आठपर्यंत अन्य व्यावसायिकांनाही व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव व्यापारी संघटनेच्यावतीने करण्यात आला.
गणपत गल्ली व मारुती गल्ली अशा बाजारपेठेतील विविध भागांतील व्यावसायिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. यावेळी विकेंड कर्फ्यू आणि शासनाच्या नियमावलीबाबत चर्चा करण्यात आली. अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, किराणा दुकान, दूध आदी व्यवसाय खुले ठेवण्याची मुभा दिली आहे. तसेच मद्याची दुकाने व हॉटेल, मास विक्री दुकानाचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला आहे. पण ग्राहकांना सर्वच सेवा अत्यावश्यक आहेत. शनिवार हा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत येत असतात. पण काही ठराविक दुकाने सुरू असल्याने केवळ काही वस्तू खरेदी करून जावे लागते. अन्य साहित्यासाठी सोमवारनंतर पुन्हा बाजारपेठेत यावे लागते. परिणामी सोमवारनंतर बाजारपेठेत गर्दी होते. त्यामुळे विकेंड कर्फ्यू काळात बाजारपेठेतील अन्य व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. पण प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गुलबर्गा व अन्य शहरामध्ये अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
प्रशासनाने कर्फ्यू काळात सर्व व्यावसायिकांना मुभा देऊन रात्री आठ वाजता दुकाने बंद करण्याची सक्ती करावी तसेच व्यापाऱयांच्या मागणीचा विचार व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी केली. बैठकीला गणपत गल्ली, मारुती गल्ली, कडोलकर गल्ली परिसरातील व्यावसायिक उपस्थित होते.









