प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या दुसऱया आठवडय़ातील विकेंड कर्फ्यूला शुक्रवारी रात्रीपासून सुरुवात झाली. सोमवार दि. 17 जानेवारीच्या पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी असणार असून यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत.
गेल्या आठवडय़ात यावर्षीचा पहिला विकेंड कर्फ्यू झाला. सरकारने शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी करण्याचा आदेश देऊनही बेळगावात मात्र शुक्रवारी रात्री 8 पासूनच दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले होते. यासंबंधी पोलीस आयुक्तांना खुलासाही करावा लागला होता. दुसऱया आठवडय़ात मात्र शुक्रवारी रात्री 10 पासून विकेंड कर्फ्यूला सुरुवात झाली.
विकेंड कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली होती. कर्फ्यूबरोबरच मास्क न लावणाऱया नागरिक व दुकानदारांवर रात्री दंडात्मक कारवाई करण्यात येत होती.
शुक्रवारी रात्रीपासून एकूण 55 तासांचा हा विकेंड कर्फ्यू असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत.
अनावश्यक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई
दूध, भाजीपाला, फळे, दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने आदी आवश्यक सेवा सुरू असणार आहेत. मात्र नागरिकांनी अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरू नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले असून अनावश्यक फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहने जप्त करण्याचा इशारा पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिला आहे.
सुरुवातीला दोन आठवडे विकेंड कर्फ्यू असणार, असे सरकारने जाहीर केले होते. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 31 जानेवारीपर्यंत रात्रीचा कर्फ्यू व विकेंड कर्फ्यू वाढविण्यात आला आहे. रुग्णसंख्येतील वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊनचा विचार सुरू होता. मात्र, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर सरकारने लॉकडाऊनचा विचार तूर्त बाजूला सारला असून सोमवारी नवी मार्गसूची जारी होण्याची शक्मयता आहे.
बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय : प्रवाशांच्या संख्येनुसार बसेस सोडणार
कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मागील आठवडय़ापासून शनिवार व रविवार विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र विकेंड कर्फ्यूच्या काळात सर्वप्रकारची बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे. मागील विकेंड कर्फ्यूत बससेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र बससेवा सुरू ठेवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी आणि रविवारी देखील बससेवा प्रवाशांच्या संख्येनुसार सुरू ठेवण्याचा निर्णय परिवहनने घेतला.
राज्य शासनाने कोरोनामुळे कडक निर्बंध घातले आहेत. शिवाय विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे या काळात बससेवा सुरू राहणार की नाही? असा संभ्रम प्रवाशांत आहे. मात्र मागील विकेंड कर्फ्यूत बससेवा सुरू होती. याबरोबर शनिवारी आणि रविवारी देखील प्रवाशांच्या संख्येनुसार बसेस विविध मार्गांवर धावणार आहेत. विकेंड कर्फ्यूच्या काळात बाजारपेठ व इतर गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या पाहून बससेवा पुरविली जाणार आहे.मागील आठवडय़ात प्रवाशांचा थंडा प्रतिसाद
मागील आठवडय़ात शनिवारी, रविवारी विकेंड कर्फ्यूच्या काळात परिवहनने विविध मार्गांवर बससेवा सुरू ठेवली होती. मात्र प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे परिवहनला दोन दिवसांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी प्रवाशांची संख्या वाढेल, अशी आशा आहे.
ऑनलाईन तिकीट बुकिंग व्यवस्था
विकेंड कर्फ्यूच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने ऑनलाईन बुकिंग व्यवस्था केली आहे. www.ksrtc.in या वेबसाईटद्वारे ऑनलाईन बुकिंग होवू शकते. तसेच परिवहनने प्रवाशांसाठी केएसआरटी या ऍपची निर्मिती केली असून प्रवासी या ऍपच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करू शकतात.









