योग्य माहिती न पुरविणाऱया अधिकाऱयांची जिल्हा पालकमंत्र्यांनी केली कानउघाडणी
प्रतिनिधी /बेळगाव
आरोग्य, कृषीसह काही खात्यांचे अधिकारी विकास आढावा बैठकीत व्यवस्थित माहिती देत नाहीत, असे सांगत माहिती न पुरविणाऱया अधिकाऱयांवर पालकमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या कर्नाटक विकास आढावा त्रैमासिक बैठकीत जिल्हा आरोग्याधिकाऱयांसह अनेक अधिकाऱयांची झाडाझडती घेण्यात आली.
लसीकरणानंतर रामदुर्ग तालुक्मयात तीन लहान मुलांचा मृत्यू झाला होता. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठकीत या प्रकरणाचा उल्लेख करीत संबंधितांवर कारवाई करण्याची सूचना केली. या घटनेला जबाबदार असणाऱया वैद्यकीय अधिकाऱयांवर कारवाई झालीच पाहिजे. येत्या तीन दिवसांत कारवाई करून अहवाल देण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी तीन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली लस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली आहे. अद्याप अहवाल आला नाही, असे सांगताच पालकमंत्री त्यांच्यावर भडकले. विकास आढावा बैठकीत तुम्ही व्यवस्थित माहिती देत नाही, असे सांगत थेट आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी संपर्क साधून त्यांच्या जागेवर अन्य अधिकाऱयांची नियुक्ती करण्याची सूचना केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन योजना आहे. मार्च अखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. कोरोनाविरुद्धच्या लढय़ासाठी 100 टक्के लसीकरण पूर्ण करावे, याबरोबरच इतर खात्यातील विकासकामेही नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी जिल्हय़ासाठी 572 कोटी अनुदान मंजूर झाले असून 248 कामांना चालना देण्यात आली आहे. त्यापैकी 216 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 2019 च्या पुरात पडझड झालेल्या घरांच्या उभारणीची कामे सुरू आहेत. जर कोणी राहिले असतील तर त्यांनाही नव्याने अर्ज करता येणार आहे. तहसीलदार व पीडीओंनी पाहणी करून पात्र लाभार्थींना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली.
लवकरच शाळांना उन्हाळी सुटी देण्यात येणार आहे. यामुळे पुढील आठवडय़ाभरात शाळकरी मुलांचे लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाच्या काळात वेगवेगळय़ा इस्पितळांना ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प, कॉन्स्ट्रट्रेटर व इतर वैद्यकीय उपकरणे पुरविण्यात आली आहेत. या उपकरणांची योग्य देखरेख करावी, अशी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आली. बैठकीत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांच्या कमतरतेबद्दल विधानसभेचे उपाध्यक्ष आनंद मामनी यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
या बैठकीत खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, कर्नाटक आदीजांबव विकास मंडळाचे अध्यक्ष दुर्योधन ऐहोळे, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्यासह जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.
सरकारी कार्यालयात अतिक्रमण
मत्सोद्योग खात्याच्या कार्यालय आवारात अतिक्रमण करण्यात आले आहे. या परिसरात शेड उभारण्यात आले आहे. ते त्वरित हटविण्याची मागणी आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी बैठकीत केली. पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी अतिक्रमण हटविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. झोपडपट्टी निर्मूलन मंडळाकडून उभारण्यात येत असलेल्या घरांची कामे संथगतीने सुरू आहेत. यासंबंधी कंत्राटदारावर दंड घालण्याची सूचना करण्यात आली.









