प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या जनतेने भाजपसाठी भरभरून प्रेम दिले आहे. त्यांच्या या प्रेमाची परतफेड आपण गोव्याचा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व विविध विकासकामांच्या माध्यमातून करणार आहे. यापुढेही गोव्यात पर्यटनदृष्टय़ा विकास साधून येथील जनतेला आर्थिक स्वावलंबन मिळवून देणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोपा विमानतळाचे ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा’ असे नामकरण करून विमानतळाच्या नावाबाबत शिक्कामोर्तब केले. यावेळी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटनराज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर उपस्थित होते.
आठ वर्षांत 72 विमानतळांची निर्मिताr
मोदी म्हणाले, भाजपने गेल्या आठ वर्षात देशात विकास करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची शान वाढवली. देशातील सामान्य माणसालाही विमान प्रवास करता यावा, यासाठी केवळ गेल्या आठ वर्षात सुमारे 72 नवीन विमानतळाची निर्मिती करण्यात आली. जे काँग्रेसला 70 वर्षांत शक्य झाले नाही, ते आम्ही आठ वर्षांत करून दाखवले आहे. विमानसेवेचे जाळे विस्तारण्याचे कारण म्हणजे सामान्य माणसालाही विमान प्रवास किफायतशीर व्हावा, हाच उद्देश होता आणि तो आता साध्य होत आहे.
मोपामुळे उत्पन्न, महसूल प्राप्ती होणार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, मोपा विमानतळ पूर्णत्वास येऊ नये म्हणून विरोधकांनी तीव्र राजकीय विरोध केला. अनेक आंदोलने केली. प्रसंगी न्यायालयातही सरकारला झगडावे लागले, तरीही न डगमता गावकऱयांच्या हितासाठी हा विमानतळ प्रकल्प पूर्णत्वास आणला गेला. याकामी मंत्रीमंडळातील सहकारी, जीएमआर कंपनीचे अधिकारी, कामगार तसेच खासकरून चांदेल, कासारवर्णे, उगवे, वारखंडे, आंबे या गावातील गावकऱयांनी विमानतळासाठी जमीन दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. दक्षिणेला दाबोळी आणि उत्तरेला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारल्याने विकासात्मकदृष्टया राज्याला मोठय़ा प्रमाणात उत्पन्न व महसूल प्राप्त होणार आहे.
‘स्वयंपूर्ण गोवा अभियाना’चे कौतुक
‘स्वयंपूर्ण गोवा’ हे अभियान गोव्याने यशस्वीरित्या राबविले. या अभियानाद्वारे जनतेचा विश्वास जिंकण्यात डॉ. प्रमोद सावंत सरकार यशस्वी झाल्याचे सांगत या अभियानाचे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात केले.
गोव्याचे ऐतिहासिक महत्त्व जपणार
गोव्याचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पायाभूत साधनसुविधांवर भर देण्याबरोबर गोव्याचा मूळ वारसा जपण्यासाठी ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व संरक्षण करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
आयुष, विमानतळ प्रकल्प गोव्याचे ‘रत्न’
धारगळ येथे उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक इस्पितळ व पेडणे तालुक्यात विस्तारलेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प गोव्याची रत्ने आहेत. या दोन्ही प्रकल्पामुळे गोव्याला स्वयंपूर्णत्व प्राप्त झाले असून, या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. दाबोळी व पेडणे येथील विमानतळ प्रकल्प हा दक्षिण व उत्तर गोव्यासाठी उत्पन्न व महसूल मोठय़ा प्रमाणात प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
हवाई विकासात गोव्याचा इतिहास ः सिंधिया
पर्यटनदृष्टय़ा गोवा हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. लोकसंख्येने कमी असलेले हे राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांना भूरळ घालते. त्यामुळेच दक्षिणेत दाबोळी विमानतळ प्रकल्प असतानाही उत्तरेतही विमानतळ प्रकल्प साकारण्यात आला आहे. इतक्या लहान राज्यात दोन विमानतळ प्रकल्प साकारल्यामुळे गोव्याने हवाई विकासातही इतिहास रचला आहे, असे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.
गोव्याला नाशिकलाही जोडणार
गोव्यात पायाभूत सुविधा निर्माण करताना या राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आणि दळण-वळणाची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय महामार्गाद्वारे भविष्यात गोव्याला नाशिक शहराशी जोडले जाईल, असे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले.









