‘कोकणी रान माणसा’ने समस्त कोकणवासीयांना दिला निर्वाणीचा इशारा : ‘आता तरी जागे व्हा!’ निसर्गाचा आदर राखा
- कोकण विकासाचे मॉडेल हे ‘नेचर प्रेंडली’च हवे!
- विकासाच्या घातक संकल्पना राबवणाऱयांना
वठणीवर आणण्यासाठी युवकांना हाक
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
कळणे म्हणा, गाळेल म्हणा की कुडाळ, बांदा, खारेपाटण बाजारपेठांतील पूर म्हणा. या सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. विकासाच्या नावाखाली आपण अगदी राक्षसाप्रमाणे निसर्ग ओरबडत चाललो आहोत आणि त्याचेच परिणाम आपणास भोगावे लागत आहेत. कोकणातील इकॉलॉजीला सुसंगत असे विकासाचे मॉडेल जोपर्यंत आपण लागू होत नाही, तोपर्यंत हे असे धक्यावर धक्के बसतच राहातील आणि यातच कोकणी माणूस एक दिवस संपून जाईल. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा, असा सल्ला ‘कोकणी रानमाणूस’ या नावाने पर्यावरणप्रेमींच्या गळय़ातील ताईत बनलेल्या प्रसाद गावडे या युटय़ूबर्सने दिला आहे.
कोकणातील निसर्ग, कोकणातील शाश्वत विकासाची मॉडेल्स, कोकणातील संस्कृती अतिशय उत्तमप्रकारे जगासमोर आणत सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणारा प्रसाद गावडे हा सिंधुदुर्गचा सुपुत्र. स्वत: इंजिनियर असला, तरी यांत्रिकीकरणाच्या मागे न लागता ‘नेचर इंजिनिअरिंग’ म्हणजेच निसर्गासोबत राहून रोजगार निर्मितीचे मॉडेल कसे उभे करायचे आणि यातून विकास कसा साधायचा, याचा अभ्यास करणारा हा युवक. आज हा युवक देश-विदेशातील कोकण प्रेमींच्या गळय़ातील ताईत बनला आहे. अतिशय संवेदनशीलपणे खरेखुरे कोकण जगासमोर आणणारा हा युवक या कोकणवर लागोपाठ कोसळत असलेल्या आपत्तींनी अतिशय व्यतिथ झालाय. मात्र यास निसर्गाला जबाबदार न धरता विकासाच्या, रोजगाराच्या नावाखाली निसर्ग ओरबडणाऱया राक्षसी प्रवृत्तीवर तो प्रचंड संतापलाय. आपला कोकण वाचवायचा असेल, तर आता येथील युवकांनी उठाव करायला हवा, असं त्याचं स्पष्ट मत आहे.
‘तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा ‘रानमाणूस’ म्हणतो, आज मायनिंगमुळे पूर्ण कळणे गाव उद्ध्वस्त झाला. त्यावेळी आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी मायनिंगवाल्यांच्या पाठिशी राहून गाववाल्यांना विरोध करणारे आज त्यांचीच शेतीभाती उद्ध्वस्त झाल्याने गळा काढताहेत. आज रेडीतील खाण व्यवसायामुळे 60 टक्के रेडीवासीयांची प्रदुषणामुळे फुफ्फुसे निकामी झालीत. कल्टिवेशनच्या नावाखाली आपण डोंगरच्या डोंगर बोडके करीत निघाल्याने गाळेलसारखे भुस्खलनाचे प्रकार सुरू झाले आहेत. आज रिव्हर साईड, बीच साईड, माऊंटन साईड कन्स्ट्रक्शनची क्रेझ वाढत चालली आहे. यात आपण आपल्या मर्यादा ओलांडून निसर्गामध्ये नको तेवढा हस्तक्षेप करीत चाललो आहोत. त्याचे परिणाम आपणास भोगावे लागत आहेत. नव्याने उभारलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रचना ही निसर्गपूरक अजिबात नाही. स्पष्ट शब्दात सांगायचे, तर जिल्हय़ाच्या मधोमध बंधाऱयाप्रमाणे भलीमोठी भिंतच उभी करून जिल्हय़ाचे चक्क दोन भाग केले, असे म्हटले तर चूक ठरू नये. त्यामुळे वरचे पाणी खाली जाण्याचे मार्गच बंद झाल्याने कुडाळ, बांद्यासारख्या बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. भविष्यात यापेक्षाही ते अधिक घुसणार असल्याचे या रानमाणसाने स्पष्ट केले.
लँड स्लायडिंगच्या वाढत्या प्रकारांबाबत बोलताना हा ‘रानमाणूस’ म्हणतो, सह्याद्रीतील फॉरेस्ट हे ‘मान्सून फॉरेस्ट’मध्ये मोडते. आज निरीक्षण केले, तर लक्षात येईल की आतापर्यंत जे काही लँडस्लायडींगचे प्रकार झालेत ते मानवी वस्तीनजीक झालेत. ज्या ठिकाणी डोंगर बोडके करण्यात आलेत, त्या ठिकाणी लँड स्लायडिंग झाले आहे. आपण इको सेन्सिटीव्हला आघात पोहोचवत असल्यामुळे त्याची फळे आपण अशा पद्धतीने भोगत आहोत, असे तो म्हणाला.
कोकणच्या विकासाबाबत बोलताना हा ‘रानमाणूस’ म्हणतो, ‘अन्य प्रांतांतील विकास पाहून त्या पद्धतीने आपण कोकणचा विकास करायला गेलो, तर या कोकणचा सत्यानाश अटळ आहे. मुळात कोकण हा इतरांसारखा नाहीच मुळी. येथील निसर्ग, येथील जैवविविधता, येथील संस्कृती, येथील सौंदर्य हे जगावेगळं आहे. या कोकणचा विकास करायचा असेल, तर येथील निसर्गाचा, येथील संस्कृतीचा, येथे शेकडो वर्षापासून राबवल्या गेलेल्या शाश्वत विकासाच्या मॉडेलचा, येथील परंपरागत ज्ञानाचा आदर राखणारे विकासाचे मॉडेल बनवले गेले पाहिजे. आजही कोकणातील दुर्गम भागांत अशी अनेक गावं आहेत, जी शहरांवर अवलंबून न राहता स्वत:चं अन्न स्वत: पिकवून अगदी आनंदी आणि निरोगी जीवन जगताहेत. सारं जग कोरोनापुढे हतबल झालंय. परंतु, आपल्या या कोकणात अशी अनेक गावे आहेत की, ज्या ठिकाणी कोरोना पोहोचूच शकलेला नाही. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे येथील व्यापारउदीम उद्ध्वस्त झाला. हजारो लोक बेरोजगार झाले. कर्जबाजारीपणा, उपासमारीमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या. पण अशा काळात कोकणातला शेतकरी मात्र व्यवस्थित राहिला. त्याच्यावर कधी उपासमारीची, कर्जबाजारी होण्याची वेळच आली नाही. आपल्या या अनोख्या जीवनशैलीमुळे तो मजबूतच राहिला. या उलट याच कोकणातील शहरात काय परिस्थिती आहे? शहरात पुराचे पाणी घुसून ज्यावेळी हाहाकार उडाला, त्यावेळी येथील शहरवासीयांना बाहेरून मदतीच्या रुपाने येणारे धान्य, बिस्किटे आणि बिसलरी पाण्यावर अवलंबून राहावे लागले. कोकणातील गावांमध्ये यापूर्वी अनेक पूर येऊन गेले. मात्र अशा वेळी फूड पाकिटे, बिसलरी पाण्याची वाट पाहाताना कोणी दिसलं नाही आणि हीच तर खरी कोकणातील ग्रामीण जीवनशैलीची ताकद आहे. ही जीवनशैली अधिक समृद्ध करुन या कोकणचा विकास घडवून आणण्याऐवजी आपण परप्रांतातील विकासाची मॉडेल्स आपल्या माथी मारून घेऊ लागलो, तर येथील निसर्ग आपणास असाच लाथाडत राहाणार. त्यामुळे आता तरी जागे व्हा, असे कळकळीचे आवाहन या रान माणसाने केले आहे.
आपला हा कोकण वाचवायचा असेल, या कोकणात विकासाची गंगा आणायची असेल, तर आता येथील युवकांनी पुढाकार घ्यायला हवा. बापजाद्यांच्या जीवावर उडय़ा मारण्यापेक्षा येथील निसर्गाचा आदर राखून आपल्या बापजाद्यांनी आपल्यासाठी जे काही मिळवून ठेवलं त्यात किंबहूना अधिक भर घालून ते पुढील पिढय़ांनाही चांगल्या पद्धतीने राखून ठेवणं व त्यातून आनंदी जीवन जगणं हाच खरा विकास आहे. विकासाचे परिमाण हे ऐशारामापेक्षा आनंदाच्या तागडीत मोजता आलं पाहिजे. ‘ज्यातून खराखुरा आनंद मिळतो, तोच खरा विकास’ ही कन्सेप्ट आता प्रचलित केली पाहिजे. कोकणातील युवकांनी आता या दृष्टीने विचार करायला हवा, असे हा ‘रान माणूस’ शेवटी म्हणाला.









