ग्रा.पं. तर्फे सेप्टिक टँक बसवून नदीचे पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे : मनपाचे डेनेजमिश्रीत पाणी नदीत : शेतकऱयांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात
दीपक बुवा / बेळगाव

विकास हा कधी कधीच दिसतो. विकासाच्या नावाखाली भकासाचे राजकारण करणाऱयांनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कधी पाऊल उचलले आहेत का? जर उचलले आहेत तर मागील 10 ते 12 वर्षांपासून बेळगावातील मार्कंडेय नदीत ड्रेनेजमिश्रीत होणाऱया सांडपाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित का? नदीकाठी असणाऱया शेतकरी व नागरिकांचे आरोग्य धोक्मयात कशासाठी? यासाठी आवाज उठवायचा तरी किती? यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र राजकारण आणि त्याच्या करण्यात येणाऱया वल्गना या केवळ आणि केवळ कागदावरच बऱया वाटतात. प्रत्यक्षात विकासाची गंगा म्हणून शेतकऱयांना सुजलाम, सुफलाम करणाऱया मार्कंडेय नदीचा प्रवास आता भकासाकडे होऊ लागला आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणत्याही राजकारण्याला अथवा अधिकाऱयांनाही नाही. त्यामुळे आज नदीचे पावित्र्य पूर्ण धोक्मयात आले आहे. यासाठी मोठे आंदोलन उभे करण्याची गरज आणि पर्यावरण अबाधित राखण्यासाठी नदीतील सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होताना दिसत आहे.
विशेष करून ग्रामीण भागात सरकारकडून राबविण्यात येणाऱया योजनांमुळे ग्रामीण भागातील सांडपाणी, डेनेज पाणी यासाठी सेप्टीक टँक उभे करून ते जमिनीमध्येच मुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अस्वच्छ पाणी हे जमिनीतच मुरविण्यात येत आहे. खास करून कंग्राळी खुर्द व इतर भागातही ही योजना मोठय़ा प्रमाणात राबविण्यात येत आहे. मात्र महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारे डेनेजचे पाणी हे थेट मार्कंडेय नदीपात्रात मिश्रीत होत आहे. याचबरोबर मोठमोठय़ा हॉस्पिटल्सचे रसायनमिश्रित डेनेजचे पाणीही नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. राजकीय वजनामुळे हा सारा घोळ सुरू असला तरी यासाठी शेतकरी आणि नागरिकांचे तसेच जनावरांचे आरोग्य टांगणीला लागले आहे. याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.

नदी, नाले आणि तलाव सुशोभित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसरीकडे महानगरपालिकेने सुरू केलेल्या विद्रुपीकरणामुळे मोठे संकट ओढवणार आहे. मार्कंडेय नदी भावी काळात धोक्यात येण्याची चिन्हे उद्भवू लागली आहेत. या नदीत महानगरपालिकेच्या हद्दीतील ड्रेनेज पाणी तसेच औद्योगिक वसाहतीचे पाणी देखील सोडण्यात येत आहे. यामुळे वाढता धोका ओळखून लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बैलूर येथील उगमस्थानापासून सुमारे 46.5 कि. मी. चा प्रवास ही नदी करते. यामुळे या 46 कि. मी. क्षेत्रात अनेक शेतकऱयांना ही नदी लाभदायी ठरते. नदीकाठी घेण्यात येणारी पिके ही या नदीच्या पाण्यावरच घेतली जातात. यामुळे उन्हाळी आणि हिवाळी पिकांनाही या नदीच्या पाण्याचाच पुरवठा केला जातो. उगमस्थानापासून ते उचगाव ते आंबेवाडी गावापर्यंत स्वच्छ पाण्याचा पुरवठा मात्र जसजशी नदी पुढे सरकत शहरालगत येते तसतसे ड्रनेज व दुर्गंधीयुक्त पाणी या नदीत मिसळते. त्यामुळे यापुढील नदीचा प्रवास या ड्रेनेज पाण्याबरोबरच होतो. याच फटका मात्र येथील शेतकऱयांना सोसावा लागत आहे.
मार्कंडेय नदीच्या पात्राचे रूंदीकरणाचे काम रोजगार हमी योजनेंतर्गत मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यात आले. नदीच्या दोन्ही बाजुने खोदाई करून नदीचे पात्र वाढविण्यात आले. हे पात्र 3 फुटांपर्यंत खोदाई करून यामध्ये अधिक पाणीसाठा कसा करावा, असे धोरण तालुका पंचायतच्या अधिकऱयांनी सुरू केले होते. पाणी अडवून ते शेतकऱयांना कसे फायदेशीर ठरेल यावर अधिक भर देण्यात आला. मात्र ड्रेनेज पाण्यामुळे त्यांचा हा मनसुबा धुळीला मिळत आहे. त्यांच्या या धोरणाला महानगरपालिकेच्या अधिकऱयांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. डेनेजचे पाणी आणि मध्यंतरी 2018 रोजी आलेल्या महापुरामुळे नदीतील पात्र पुन्हा विस्कळीत झाले. परिणामी शेतकऱयांना फलदायी ठरणाऱया या नदीला दुर्गंधीचा विळखा वाढत चालला आहे.

मार्कंडेय बचावसाठी संघ-संस्था किंवा ज्यांना या पाण्याचा धोका आहे तेच शेतकरी गप्प का? हा भविष्याचा धोका त्यांना दिसून येत नाही का? यासाठी शेतकऱयांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा नदीची केंव्हा गटारगंगा होईल हे समजणार नाही. सध्या कंग्राळी खुर्द, कडोली आणि काकती परिसरात हे ड्रेनेजचे पाणी नदीपात्रातून वाहू लागले आहे. नदीकाठी असणाऱया शेतकऱयांच्या पिकांनाही या पाण्यामुळे धोका निर्माण होत आहे.
सध्या कंग्राळी येथे नदीत पाण्याऐवजी ड्रेनेजचे पाणी अधिक दिसून येते. कधीकाळी स्वच्छ वाहणारे पाणी पाहून त्यात बागडणारी मुले आज तेच काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी पाहून नाकाला बोट धरून जात आहेत. ड्रेनेजच्या पाण्यामुळे परिसरात इतकी दुर्गंधी पसरली आहे की नदीकडे जाण्यासही नागरिक धजावत आहेत. एकेकाळी याच भागात नदीकाठी चरण्यासाठी व पाणी पिण्यासाठी जनावरे जात असत. परंतु आज या परिसरात जनावरांना चरणेही बंद केले आहे. जनावरांची ही अवस्था असेल तर माणसांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नदीकाठालगत असलेल्या शहराच्या उपनगरांतून हे ड्रेनेजचे पाणी थेट नदीत सोडण्यात आले आहे.
शहरातील विशेषतः उत्तर भागातून हे पाणी अधिक प्रमाणात नदीत मिसळते. शाहूनगर, आंबेडकरनगर, साई कॉलनी, सह्याद्रीनगर, नेहरुनगरातील काही भाग, कंग्राळी खुर्द, मार्कंडेयनगर, एपीएमसी, ज्योतीनगर आदी परिसरातील ड्रेनेजचे पाणी अधिक प्रमाणात नदीत मिसळत असते. तर केएलई, वैभवनगर, यमनापूर, कंग्राळी बुद्रुक, होनगा औद्योगिक वसाहत, काकती आदी भागातील ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे नदीतून दुर्गंधीयुक्त पाण्याचा फटका बसत आहे. मात्र याचे सोयरसुतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
मनपाचा कारभार मनमानी

एकीकडे नद्याजोड प्रकल्प तसेच नद्यांचे पावित्र्य राखण्याकडे केंद्र व राज्य सरकार कोटय़वधी रुपये खर्च करीत आहे. तर बेळगाव येथील महानगरपालिका नदीपात्र कसे दुर्गंधी होईल याकडेच लक्ष देत काहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसे पाहता महानगरपालिकेने ज्या भागात ड्रेनेज पाणी जाण्यासाठी व्यवस्था नसेल तर त्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता ड्रेनेजचे पाणी उघडय़ावर व नदीपात्रात सोडून अनेकांच्या आरोग्याशी खेळण्याचाच प्रकार मनपाने चालविला आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शेतकऱयांनी वेळीच आवाज उठविणे गरजेचे
मार्कंडेय नदीत मोठय़ा प्रमाणात ड्रेनेजयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने याचा सर्वांत जास्त फटका नदीपात्राशेजारील शेतकऱयांना व गावकऱयांना मोठय़ा प्रमाणात बसणार आहे. भविष्यातील हा संभाव्य धोका ओळखून ड्रेनेजमुक्त मार्कंडेय नदीसाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा अधिक प्रमाणात धोका शेतकऱयांना होणार असून शेतजमिनीवरही भविष्यात याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. जर शेतीच पिकली नाहीतर शेतकरी करणार काय? याचा विचार आताच शेतकऱयांनी करणे गरजेचे आहे. त्यासाठी मार्कंडेय बचाव आंदोलनाचा एल्गार शेतकऱयांनीच करावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणी झिरपुन विहिरींचे पाणी दूषित
सर्रास ग्रामीण भागातील पिण्याच्या विहिरी या नदीपत्रात व नदीकिनारी खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज या विहिरींचा पाणी पुरवठा गावात केला जातो. कडोली, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक, काकती, होनगा आदी भागातील अनेक विहिरी या नदीपात्रात आहेत. मात्र सध्या नदीतील ड्रेनेजयुक्त पाणी जमिनीत झिरपुन ते विहिरीतील स्वच्छ पाण्यात मिसळत आहे. यामुळे भविष्यात विहिरीतील पाणी दूषित होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सध्या याचे थेट परिणाम दिसत नसले तरी ही धोक्याची घंटा ओळखून आतापासूनच याचे पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे. भविष्यात जर विहिरीत दूषित पाणी मिश्रीत झाले तर आरोग्यांच्या अनेक समस्येचा धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी मार्कंडेय बचाव आंदोलनाची गरज निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका

कोणत्याही परिस्थितीत नदीचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मात्र मोठमोठे हॉस्पिटल्स असो किंवा इतर कोणतेही औद्योगिक क्षेत्र असो. त्यामधून निघणारे रासायनिक पाणी याचे शुद्धीकरण करूनच ते नदीत सोडल्यास सोयीचे ठरणार आहेत. एकीकडे नागरिकांना आजारी पाडविण्याचे कामही हे हॉस्पिटल्स करतात आणि त्यांना बरे करण्याचेही तेच करतात. जे रसायनमिश्रीत पाणी सोडले जात आहे त्यामुळे शेतात व इतर पिकांवर त्याचा परिणाम होतो. तोच भाजीपाला आपण खात असतोच. त्यामुळे आपले आरोग्य धोक्मयात येत असते. याचा गांभीर्याने विचार करून हॉस्पिटल्स असो किंवा महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारे पाणी हे शुद्धीकरण करून नदीत सोडल्यास नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
– जि.पं.सदस्या सरस्वती पाटील
महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज

आपण नदी, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच सरकारने सेप्टीक टँक ही योजना आणली असून त्याप्रमाणे स्वच्छतागृहाचे पाणी, शौचालयाचे पाणी आम्ही जमिनीतच झिपरण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी नदीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र मनपाचे डेनेजमिश्रीत पाणी जात असल्याने नदीचे पावित्र्य धोक्मयात आले आहे. याकडे आता महानगरपालिकेनेच लक्ष देण्याची गरज आहे.
– ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी
नदी स्वच्छतेसाठी पावले उचला

नदीशेजारी असणाऱया शेतकरी व नागरिक यांचे जीवन जगणे कठीण बनले आहे. एकीकडे पर्यावरणाचा नारा देणारे आणि कधीकाळी सभेमध्ये भाषण ठोकणारे लोकप्रतिनिधी अशा गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे याचा फटका एक दिवस साऱयांनाच बसणार आहे. त्यामुळे आताच नदी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली.
– सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कटांबळे
ड्रेनेजच्या समस्येकडे कुणाचेच लक्ष नाही
मागील अनेक वर्षांपासून या नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. मात्र याकडे गांभीर्याने पाहताना कोणीच दिसत नाही. रोजगार हमी योजनेंतर्गत नदीची स्वच्छता राखण्याचे काम करण्यात येत असले तरी ड्रेनेजमिश्रीत पाणी सोडून मनपाने या कामाला खो घातला आहे. यामुळे नदीचे पावित्र्य राखण्यास लोकप्रतिनिधींनी किती तत्परता दाखवली आहे, हेच दिसून येते.
-उमेश चौगुले, शेतकरी
जलुशुद्धीकरण बसवा

मागील चार ते पाच वर्षांपूर्वी उद्योग खात्रीतून नदीच्या विकासाला चालना देण्यात आली. मोठय़ा प्रमाणात कामही झाले. दरम्यान आलेल्या महापुरामुळे हे काम वाया गेले आहे. नदीकाठी अनेक विहिरी खोदाई करण्यात आल्या आहेत. त्या विहिरींमध्ये हे डेनेजमिश्रीत पाणी जात नसल्याने अनेकांचे आरोग्य संकटात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी एक तर मोठय़ा प्रमाणात जलशुद्धीकरण केंद्र बसवावे व याचा उपयोग गावातील शेतकरी बांधवांना करू द्यावा.
-ग्रा.पं.सदस्य चेतक कांबळे
प्रशासनाने त्वरित गांभीर्य ओळखावे

बेळगाव येथील मुख्य आणि जीवनदायनी असणारी मार्कंडेय नदीचा प्रवास आता मृत्युदायीनीकडे सुरू आहे. प्रशासनाने जर या नदीचे पावित्र्य अबाधित राखले नाही तर मोठा अनर्थ होणार आहे. याचा फटका शेतकऱयांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– मदन पावले-सामाजिक कार्यकर्ते
शेतातील पिकांना मोठा फटका

आपण रात्रंदिवस शेतात घाम गाळतो. मात्र नदीकाठी असणाऱया शेतीला डेनेजमिश्रीत पाण्यामुळे मोठा फटका बसत आहे. पावसात याची धास्ती जाणवत नाही. मात्र उन्हात शेतामध्ये पाणी पाजविताना पायाला त्रास होतो. हे सर्व डेनेजमिश्रीत पाणी महानगरपालिकेच्या हद्दीतून येत असले तरी याकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. जर अशीच अवस्था राहिली तर अनेकांना मार्कंडेय नदी केवळ आठवणीतच ठेवावी लागणार आहे. त्यामुळे जर आता प्रयत्न झाले नाहीत तर विकासगंगेची भकास गंगा होण्यास उशीर लागणार नाही. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
-सुरेश पाटील,शेतकरी









