महापालिका अधीक्षक अभियंत्यांनी घेतला शहरातील विकासकामांचा आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. विकासकामांचा आढावा महापालिका अधीक्षक अभियंत्यांनी बुधवारी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱया कामाची माहिती घेतली. एसएफसी निधी आणि 14 वा वित्त आयोग अनुदान अशा विविध निधीमधून राबविण्यात येणारी विकासकामे पूर्ण करण्याचा आदेश त्यांनी दिला.
राज्य सरकारने मंजूर केलेला निधी व महापालिकेच्या विविध निधीमधून विकासकामे राबविण्यात येत आहेत. 125 कोटी रुपये अनुदानांतर्गत विकासकामे राबविण्यात येत आहेत. 14 वे वित्त आयोग अनुदान, एसएफसी अनुदानामधून राबविण्यात येणाऱया विकासकामांचा प्रगती आढावा घेऊन अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी विविध सूचना केल्या. 125 कोटी अनुदान, एसएफसी अनुदान, 13 व 14 वा वित्त आयोग निधीमधून राबविण्यात येणारी प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिला.
शहरातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे खड्डे बुजविण्यासह नव्याने डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर कामांचा दर्जा तपासून विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. काही विकासकामांबाबत तक्रारी वाढत असल्याने थर्ड पार्टीकडून अहवाल घेतला जातो. तरीदेखील विकासकामे व्यवस्थित राबविली जात नसल्याच्या तक्रारी होत आहेत. काही कामे पूर्ण झाली असताना बिले अदा करण्यात आली नाहीत. त्यामुळे बिले अदा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते उपस्थित होते.









