कारवार : कारवार-अंकोला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे हाती घेण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी आमदार रुपाली नाईक यांनी ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्याकडे केली. मंत्री ईश्वरप्पा कारवारच्या दौऱयावर आले असताना त्यांना सादर केलेल्या निवेदनात आमदार नाईक यांनी असे म्हटले आहे की, कारवार आणि अंकोला तालुक्यांच्या ग्रामीण भागात उन्हाळय़ात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर स्वरुप धारण करते. इतकेच नव्हे तर समुद्राजवळ असलेल्या विहिरीमधील पाणी खारट झाल्याने वापरता येत नाही. कारवार तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत काळी नदीतून तालुक्यातील केरवडी ग्रा. पं. व्याप्तीतील 14 खेडय़ांना पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या योजनेच्या नूतनीकरणासाठी आणि घोटेगाळी येथे पिण्याच्या पाण्याच्या युनिटची स्थापना केली तर घोटेगाळी परिसरातील 9 खेडय़ांच्या पाण्याची समस्या सुटणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी अनुदान मंजूर करण्याची मागणी करून आमदार नाईक यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, 2019 आणि 2020 मधील अतिवृष्टीमुळे अंकोला तालुक्यातील अनेक रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. रस्ते सुरळीत करण्यासाठी 12 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे.
ग्रा. पं. इमारतीसाठी निधी मंजुरीची मागणी
कारवार आणि अंकोला तालुक्यातील काही ग्रा. पं. च्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. जीर्ण इमारती पाडून त्याजागी नवीन इमारती बांधणे गरजेचे आहे. ग्रा. पं. च्या नवीन इमारती बांधण्यासाठी अनुदान मंजूर करण्याची मागणीही आमदार नाईक यांनी निवेदनात केली आहे.









