येडियुराप्पांनी घेतली पंतप्रधानांची भेट : दिल्ली दौऱयावेळी कर्नाटक भवनच्या कामाचीही पाहणी
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची भेट घेतली आहे. राज्यातील विविध योजनांसाठी अनुदान देण्याची विनंती त्यांनी यावेळी पंतप्रधानांकडे केली. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीची माहितीही त्यांना दिली. मात्र, राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत यावेळी चर्चा झाली का, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही.
राज्यातील भद्रा पाणीपुरवठा योजनेला राष्ट्रीय योजना म्हणून घोषणा करावी, बेंगळूरमधील पेरिफेरल रिंगरोड निर्माण करण्यासाठी 6 हजार कोटी रुपये अनुदान द्यावे, अशी विनंती येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. कावेरी नदीवर निर्माण करण्यात येणाऱया प्रस्तावित मेकेदाटू जलाशय योजनेला मंजुरी, बेंगळूरमध्ये अमेरिकेचे दुतावास स्थापन करण्याबाबतच चर्चा झाल्याचे समजते.
येडियुराप्पा यांनी सायंकाळी कर्नाटक भवनच्या नूतन इमारत बांधकामाचीही पाहणी केली. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या खासदार शोभा करंदलाजे, भगवंत खुबा, ए. नारायणस्वामी, राजीव चंद्रशेखर यांची भेट घेऊन अभिनंदन केले.
सहा महिन्यांनंतर येडियुराप्पा हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला गेल्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले होते. सायंकाळी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेबद्दल संक्षिप्त माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान, नेतृत्त्व बदलाविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना त्यांनी या अफवांविषयी आपल्याला माहिती नाही. तुम्हीच माहिती द्या, असे मार्मिक उत्तर दिले.









