वृत्तसंस्था/ लंडन
यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी विंडीजचा 15 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी राखीव खेळाडूत स्थान मिळविणारा वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल याने दोन सरावाच्या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने त्याला पहिल्या कसोटीसाठी विंडीज संघात स्थान देण्यात आले.
कोरोना महामारी संकटानंतर इंग्लंडमध्ये जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर आता पहिल्यांदाच कसोटी मालिका खेळविली जात आहे. या कसोटी मालिकेसाठी विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. त्यावेळी गॅब्रिएलचा राखीव खेळाडूत समावेश करण्यात आला होता. गॅब्रिएलने सरावाच्या दोन सामन्यांमध्ये समाधानकारक कामगिरी केल्याने विंडीजच्या व्यवस्थापन समितीने त्याला पहिल्या कसोटीसाठी संधी देण्याचा निर्णय घेतला.
विंडीजच्या गोलंदाजीचा भार प्रामुख्याने कर्णधार जेसन होल्डर, रॉच, चेमर होल्डर, जोसेफ व रिफेर यांच्यावर राहील. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर झालेल्या सरावाच्या दोन सामन्यांत गॅब्रिएलने तीन डावात 122 धावांच्या मोबदल्यात 8 गडी बाद केले. 32 वषीय गॅब्रिएलने 2012 साली लॉर्ड्स मैदानावर आपले कसोटी पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 45 कसोटीत 133 बळी मिळविले आहेत.
दोन वर्षापूर्वी सेंट ल्युसिया येथे झालेल्या लंकेविरुद्ध कसोटी सामन्यात गॅब्रिएलने आपली सर्वोत्तम कामगिरी करताना 121 धावात 13 बळी मिळविले होते. त्याने या सामन्यात एका डावात 62 धावात 8 गडी बाद केले होते. विंडीजचा संघ सध्या मँचेस्टरमध्ये असून तो साऊदम्पटनला रवाना होणार आहे. विंडीजचा संघ या मालिकेत विस्डेन चषक स्वतःकडे राखण्यासाठी प्रयत्न करेल, असे कर्णधार जेसन होल्डरने म्हटले आहे.
विंडीज संघ- जेसन होल्डर (कर्णधार), ब्लॅकवूड, बोनेर, पेग ब्रेथवेट, बुक्स, जॉन कॅम्पबेल, रॉस्टन चेस, कॉर्नवॉल, डॉवरिच, गॅब्रिएल, चेमार होल्डर, शाय हॉप, जोसेफ, रिफेर आणि केमर रॉच.









