वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
यजमान विंडीज आणि पाकिस्तान यांच्यातील चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 9 षटकात 5 बाद 85 धावा जमविल्यानंतर पावसाला प्रारंभ झाला आणि शेवटपर्यंत तो थांबू न शकल्याने पंचांनी हा सामना रद्द केल्याचे घोषित केले.
पावसामुळे षटकांची कपात करण्यात आलेल्या या सामन्यात विंडीजने 9 षटकात 5 बाद 85 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार पोलार्डने केवळ 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22 तर पुरनने 11 चेंडूत 2 षटकारांसह 13 तसेच सिमॉन्सने 2 चौकारांसह 9, लेविसने 1 चौकारासह 6, गेलने 1 षटकारसह 7, रसेलने 1 षटाकारासह 7 आणि हेतमेयरने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. विंडीजच्या फलंदाजांनी 6 षटकार आणि 5 चौकार ठोकले. पाकतर्फे हसन अलीने 11 धावांत 2 तर मोहम्मद वासीम, मोहम्मद हाफीज आणि उस्मान कादीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कोरोना समस्येमुळे पाच सामन्यांची ही मालिका आता चार सामन्यांची खेळविण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या मंडळांनी घेतला होता. पण आता पुन्हा त्यामध्ये बदल करण्यात आला असून आता ही मालिका तीन सामन्यांची खेळविण्यात येणार आहे. या मालिकेतील उर्वरित सामने गयानामध्ये खेळविले जातील. पुढील सामना शनिवारी होणार आहे.









