वृत्तसंस्था/ ढाका
विंडीजचा क्रिकेट संघ रविवारी बांगलादेशमध्ये दाखल होत आहे. या दौऱयासाठी विंडीज संघातील खेळाडूंना येत्या काही दिवसामध्ये अनेक चाचण्याना सामोरे जावे लागणार आहे. कोरोना समस्येमुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी कोरोना संदर्भात नियमावलीचे पालन करण्याचा करार गेल्या डिसेंबरमध्ये केला होता.
विंडीज आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. 20 आणि 22 जानेवारीला पहिले दोन वनडे सामने ढाका येथे खेळविले जातील तर या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 25 जानेवारी चित्तगाँगमध्ये होणार आहे. या मालिकेनंतर उभय संघातील पहिली कसोटी 3 फेब्रुवारीपासून ढाका येथे तर दुसरी कसोटी 11 फेब्रुवारीपासून होईल. या मालिकेतील सर्व सामने बंझ्दस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविले जातील.
विंडीजचा संघ बांगलादेशमध्ये दाखल झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये या संघातील खेळाडूंना तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्यानंतर या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेतली जाईल. विंडीजचा या दौऱयातील पहिला सरावाचा सामना 18 जानेवारीला होणार आहे. विंडीजच्या होल्डर, पोलार्ड, ब्रॅव्हो, कॉट्रेल, लेवीस, शाय हॉप, हेतमेयर आणि पूरन यांनी कोरोनाच्या भीतीमुळे या दौऱयावर जाण्यास नकार दिला आहे.









