मँचेस्टर : वेस्ट इंडीज व इंग्लंड यांच्यात शुक्रवारपासून येथील ओल्ड ट्रफोर्डवर तिसरी व निर्णायक कसोटी सुरू होत असून दुसऱया कसोटीतून वगळलेल्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला इंग्लंड संघात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 पासून सामन्याला सुरुवात होईल.
पहिली कसोटी जिंकून पाहुण्या विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली होती. पण दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडने बरोबरी साधण्यात यश मिळविले. त्यामुळे या तिसऱया कसोटीला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्याला दुसऱया कसोटीतून वगळण्यात आले होते. त्याला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते आणि दोन्ही चाचणीत निगेटिव्ह आल्याने त्याला आधी संघासमवेत सराव करण्याची परवानगी देण्यात आली आणि आता संघातही स्थान देण्यात आले आहे. मात्र सोशल मीडियामध्ये आर्चरविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी झाल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. त्यामुळे तिसऱया कसोटीत आपली निवड झाल्यास आपण शंभर टक्के योगदान देऊ शकणार नाही, असे त्याने एका वृत्तपत्रातील स्तंभात म्हटले होते. कर्णधार जो रूट व प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड यांनी आर्चरची मानसिकता खेळण्यायोग्य आहे का, याचा आढावा घेऊनच त्याच्या समावेशाबाबत निर्णय घ्यावा, असे अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटले होते.
विस्डेन ट्रॉफी सध्या विंडीजकडे असून 1988 नंतर इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकून ही ट्रॉफी स्वतःकडेच राखण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ‘गेल्या 32 वर्षात जे घडले नाही, ते साध्य करण्याची संधी मिळाली असल्याची आठवण खेळाडूंना वारंवार करून दिली जात आहे,’ असे विंडीजचे साहायक प्रशिक्षक रॉडी एस्टविक म्हणाले.
जन्माने वेस्ट इंडियन असलेला आर्चर हा प्रतिभावंत गोलंदाज असून त्याने गेल्या वर्षी पदार्पण केल्यानंतर आतापर्यंतच्या 8 कसोटीत 28.12 धावांच्या सरासरीने 33 बळी मिळविले आहेत आणि त्यात पाच किंवा त्याहून अधिक बळी त्याने तीन वेळा मिळविले आहेत. दुसरी कसोटी 113 धावांनी जिंकताना आपल्याकडे जलद गोलंदाजीचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे इंग्लंडने दाखवून दिले आहे. स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय पुनरागमन करताना या कसोटीत 6 बळी टिपले. सात आठवडय़ाच्या कालावधी इंग्लंडला सहा कसोटी खेळायच्या आहेत. त्यापैकी तीन कसोटी पाकिस्तानविरुद्ध होणार आहेत. त्यामुळे इंग्लंडने आपल्या जलद गोलंदाजांना रोटेट करण्याचे धोरण आखले असून दुसऱया कसोटीत विश्रांती देण्यात आलेल्या अँडरसनला त्याच्या घरच्या मैदानावर खेळण्याची संधी दिली जाईल.
दरम्यान, डावखुरा स्पिनर जॅक लीचला सॉमरसेटमधील त्याचा सहकारी स्पिनर डॉन बेसच्या जागी संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. विंडीज संघात उजव्या हाताने खेळणारे अनेक फलंदाज असल्याने फलंदाजांपासून बाहेर चेंडू वळविण्याची क्षमता लीचमध्ये आहे. यासाठी त्याला प्राधान्य दिले जाण्याची अपेक्षा आहे. बेन स्टोक्सला मात्र वगळले जाण्याची अजिबात शक्यता नाही. दुसऱया कसोटीत त्याने 176 व नाबाद 78 धावा आणि 3 बळी मिळवित इंग्लंडच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीमुळे त्याने आयसीसी क्रमवारीतही फलंदाजांत तिसऱया तर अष्टपैलूंमध्ये अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
विस्डेन ट्रॉफी सध्या विंडीजकडे असून 1988 नंतर इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकण्याची तसेच ही ट्रॉफी आपल्याकडेच राखण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ‘गेल्या 32 वर्षात जे घडले नाही, ते करून दाखविण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याची आठवण खेळाडूंना वारंवार करून दिली जात आहे,’ असे विंडीजचे साहायक प्रशिक्षक रॉडी एस्टविक म्हणाले. या सामन्यातही विंडीज संघ जलद चौकडी कायम ठेवण्याची शक्यता आहे. दुसऱया कसोटीवेळी किरकोळ दुखापतीमुळे गॅब्रिएल व अल्झारी जोसेफ यांनी मैदान सोडले होते. येथील खेळपट्टी फिरकीस अनुकूल ठरण्याची अपेक्षा असल्याने रहकीम कॉर्नवाल या स्पिनरला संघात स्थान देण्याचा पर्यायही विंडीजकडे आहे.









