आयसीसी टी-20 विश्वचषक : स्कॉटलंडची 42 धावांनी मात, वॅट-लियास्कचा भेदक मारा, जॉर्ज मुन्सेचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था /होबार्ट
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नामिबियाने माजी चॅम्पियन लंकेला पराभवाचा धक्का दिल्यानंतर दुसऱया दिवशी स्कॉटलंडनेही दोन वेळचे चॅम्पियन वेस्ट इंडीजला 42 धावांनी पराभवाचा धक्का देत खळबळ माजविली. नाबाद 66 धावा फटकावणाऱया स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी मिळाल्यावर त्यांनी निर्धारित 20 षटकांत 5 बाद 160 धावा जमविल्या. सलामीवीर जॉर्ज मुन्सेने 53 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 66 धावा फटकावल्या. त्यानंतर स्कॉटलंडने विंडीजचा डाव 18.3 षटकांत 118 धावांत गुंडाळून सनसनाटी विजय नोंदवला. आता विंडीजला सुपर 12 मध्ये स्थान मिळविण्यासाठी पुढील सामन्यात झिम्बाब्वेवर विजय मिळवावा लागेल. याउलट रिची बेरिंग्टनच्या नेतृत्वाखालील स्कॉटलंडला सुपर 12 फेरी गाठण्यासाठी आयर्लंडवर विजय मिळविल्यास पुरेसे ठरणार आहे. या सामन्यावेळी पावसामुळे 20 मिनिटे खेळ थांबविण्यात आला होता. खेळपट्टी संथ झाल्याने त्याचा लाभही स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी उठविला.
संथ खेळपट्टीवर 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणे विंडीजला जड गेले. फलंदाजीत फारशी खोली नसलेल्या विंडीजला शिमरॉन हेतमेयरची उणीव प्रकर्षाने जाणवली. सलामीवीर काईल मेयर्सने उत्तम सुरुवात करून देताना 13 चेंडूत 20 धावा फटकावल्या. त्यात 3 चौकार, एक षटकार होता. पण सामनावीर जॉर्ज मुन्सेने डीप मिडविकेटवर अप्रतिम झेल टिपत त्याची वादळी खेळी संपुष्टात आणली. दुसरा सलामीवीर ब्रँडन किंगही पॉवरप्लेमध्ये 15 चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. ऑफस्पिनर लियास्कने कर्णधार पूरनला बाद केल्यानंतर विंडीजची स्थिती 10.1 षटकांत 5 बाद 69 अशी झाली. अष्टपैलू जेसॉन होल्डरने नंतर काही चमकदार फटके लगावले. पण त्याचे प्रयत्न शेवटी अपुरे पडले. त्याने 33 चेंडूत 4 चौकार, एक षटकारासह 38 धावा काढल्या. स्कॉटलंडच्या मार्क वॅटने 12 धावांत 3, ब्रॅड व्हील व मायकेल लियास्क यांनी प्रत्येकी 2, जोश डॅव्ही व साफियान शरिफ यांनी एकेक बळी मिळविला.
मुन्सेचे नाबाद अर्धशतक

तत्पूर्वी, मुन्सेने स्कॉटलंडला जलद सुरुवात करून देताना पॉवरप्लेमध्ये बिनबाद 54 धावांची मजल मारून दिली. पावसाच्या ब्रेकनंतर विंडीजने त्यांची स्थिती 12 षटकांत 3 बाद 86 अशी केली. पण मुन्सेने अखेरच्या टप्प्यात आक्रमक फटकेबाजी करीत शेवटच्या चार षटकांत 38 धावांची बरसात केली.
संक्षिप्त धावफलक
स्कॉटलंड 20 षटकांत 5 बाद 160 : जॉर्ज मुन्से नाबाद 66 (53 चेंडूत 9 चौकार), मायकेल जोन्स 20 (17 चेंडूत 3 चौकार), रिची बेरिंग्टन 16 (14 चेंडूत 1 षटकार), कॅलम मॅक्लिऑड 23 (14 चेंडूत 4 चौकार), ख्रिस ग्रीव्ह्ज नाबाद 16 (11 चेंडूत 2 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी : अल्झारी जोसेफ 2-28, होल्डर 2-14, स्मिथ 1-31.
विंडीज 18.3 षटकांत सर्व बाद 118 : मेयर्स 20 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), एव्हिन लेविस 14 (13 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), किंग 17 (15 चेंडूत 3 चौकार), होल्डर 38 (33 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), अवांतर 7. गोलंदाजी : मार्क वॅट 3-12, ब्रॅड व्हील 2-32, लियास्क 2-15, डॅव्ही 1-34, शरिफ 1-23.
झिम्बाब्वेचा आयर्लंडवर शानदार विजय

होबार्ट : आयसीसी टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेला ऑस्ट्रेलियात रविवारपासून प्रारंभ झाला असून पात्रतेचे सामने खेळविले जात आहेत. सोमवारी झालेल्या ब गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात झिम्बाब्वेने आयर्लंडचा 32 धावांनी पराभव केला. झिम्बाब्वे संघातील सिकंदर रझाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 बाद 174 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडने 20 षटकात 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.
या सामन्यात झिम्बाब्वेच्या डावात सिकंदर रझाने 48 चेंडूत तुफान फटकेबाजी करताना 5 षटकार आणि 5 चौकारांसह 82 धावा झोडपल्या. मधेव्sारेने 19 चेंडूत 4 चौकारांसह 22, सिन विलियम्सने 1 षटकारासह 12 शुंभाने 14 चेंडूत 1 चौकारासह 16, जाँग्वेने 10 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 20 धावा जमविल्या. कर्णधार एर्विन 1 चौकारासह 9 धावांवर बाद झाला. तर चकबव्हाला खाते उघडता आले नाही. आयर्लंडतर्फे ज्योस लिटलने 24 धावात 3, मार्क ऍडेरने 39 धावात 2 तर सिमी सिंगने 31 धावात 2 गडी बाद केले. झिम्बाब्वेच्या डावात 6 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये कॅम्फरने 22 चेंडूत 1 चौकारासह 27, डॉकरेलने 20 चेंडूत 3 चौकारांसह 24, डिलेनीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 24, टकेरने 2 चौकारांसह 11, ऍडेरने 1 षटकारासह 9 तर मॅकरेथीने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 22 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे मुझरबानी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 23 धावात 3, नॅग्रेव्हाने 22 धावात 2, चताराने 22 धावात 2, विलियम्सने 20 धावात 1 आणि सिकंदर रझाने 22 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे 20 षटकात 7 बाद 174 (सिकंदर रझा 82, मधेवेरे 22, शुंभा 16, जाँग्वे नाबाद 20, विलियम्स 12, एर्विन 9, लिटल 3-24, ऍडेर 2-39, सिमी सिंग 2-31), आयर्लंड 20 षटकात 9 बाद 143 (कॅम्फर 27, डॉकरेल 24, डिलेनी 24, टकेर 11, मॅकरथी नाबाद 22, लिटल नाबाद 7, मुझरबानी 3-23, चतारा 2-22, नॅग्रेव्हा 2-22, विलियम्स 1-20, सिकंदर रझा 1-22).









