वृत्तसंस्था / सेंट जोन्स
कोरोना महामारीमुळे जागतिक क्रिकेट क्षेत्र ठप्प झाल्यानंतर आता विंडीजमध्ये क्रिकेटला पुन्हा पुढील आठवडय़ापासून प्रारंभ होणार आहे. गेल्या मार्च महिन्यापासून कोव्हीड-19 महामारीमुळे विविध राष्ट्रातील सर्व क्रिकेट स्पर्धा तहकुब किंवा लांबणीवर टाकल्या होत्या. आता कॅरेबियनमध्ये तब्बल तीन महिन्यांच्या विश्रतीनंतर पुढील आठवडय़ात पहिली टी-10 व्हिन्सी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. सेंट व्हिन्सेंट येथे पहिली टी-10 व्हीपीएल लिग क्रिकेट स्पर्धा होणार असून यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे पुनरागमन होणार आहे. ही पहिली व्यवसायिक क्रिकेट स्पर्धा हंगामी स्वरुपातील नव्या नियमावलीनुसार खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत चेंडुला लकाकी आणण्यासाठी सलाईव्हाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली राहिल. सेंट व्हिन्सेंटच्या शासनातर्फे कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. या स्पर्धेत एकूण 30 सामने खेळवले जाणार असून एकूण 6 प्रँचायजी संघांचा समावेश आहे. केसरिक विल्यम्स, सुनील अँब्रिस, ओबेद मॅकॉय हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सहभागी होत आहेत.









