वृत्तसंस्था/ अँटिग्वा
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत गुरुवारी खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान विंडीजने लंकेला विजयासाठी 377 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. दिवसअखेर लंकेने दुसऱया डावात विनबाद 29 धावा जमविल्या होत्या.
दोन सामन्यांच्या या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्याने ही दुसरी कसोटी निर्णायक ठरणार आहे. खेळाच्या शेवटच्या दिवशी लंकेला विजयासाठी 348 धावांची गरज आहे.
या दुसऱया सामन्यात विंडीजचा पहिला डाव 354 धावावर आटोपल्यानंतर लंकेने पहिल्या डावात 258 धावा जमविल्या. विंडीजने पहिल्या डावात लंकेवर 96 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. विंडीजने खेळाच्या चौथ्या दिवशी दुसऱया डावात जलद धावा जमविण्यावर अधिक भर दिला. कर्णधार ब्रेथवेटने तसेच मेयर्स आणि माजी कर्णधार होल्डर यांनी शानदार अर्धशतके झळकविली. विंडीजने आपला दुसरा डाव 72.4 षटकात 4 बाद 280 धावांवर घोषित करून लंकेला विजयासाठी 377 धावांचे आव्हान दिले. पहिल्या डावात शतक नोंदवणाऱया कर्णधार ब्रेथवेटने 196 चेंडूत 4 चौकारासह 85 धावा झकळविल्या. कॅम्पबेलने 1 चौकारासह 10 तर ब्लॅकवुडने 2 चौकारासह 18 धावा जमविल्या. बेथवेट आणि मेयर्स यांनी तिसऱया गडय़ासाठी 82 धावांची भागीदारी केली. मेयर्सने 76 चेंडूत 8 चौकारासह 55 धावा जमविल्या. मेयर्स बाद झाल्यानंतर बेथवेट आणि माजी कर्णधार होल्डर यांनी चौथ्या गडय़ासाठी 87 धावांची भर घातली. होल्डरने 88 चेंडूत 7 चौकारासह जलद नाबाद 71 तर डिसिल्वाने 2 चौकारास नाबाद 20 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रातील तासभराचा कालावधी बाकी असताना विंडीजने आपला दुसरा डाव 4 बाद 280 धावावर घोषित केला. लंकेतर्फे लकमल आणि चमिरा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. लंकेने दुसऱया डावाला सावध सुरुवात करताना 9 षटकात विनबाद 29 धावा जमविल्या. थिरिमने 17 तर करुणारत्ने 11 धावावर खेळत होते.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज प. डाव सर्वबाद 354, लंका प. डाव 107 षटकात सर्वबाद 258, विंडीज दु. डाव 72.4 षटकात 4 बाद 280 डाव घोषित (बेथवेट 85, कॅम्पबेल 10, ब्लॅकवुड 18, मेयर्स 55, होल्डर नाबाद 71, डिसिल्वा नाबाद 20, लकमल 2-62, चमिरा 2-74). लंका दु. डाव 9 षटकात विनबाद 29 (थिर्मेनी खेळत आहे 17, करुणारत्ने खेळत आहे 11).









