वृत्तसंस्था / ब्रिजटाऊन :
वेस्ट इंडीजचे माजी महान क्रिकेटपटू सर एव्हर्टन वीक्स यांचे बुधवारी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. विंडीजच्या सुप्रसिद्ध तीन ‘डब्ल्यूज’पैकी ते एक होते. सर प्रँक वॉरेल व सर क्लाईड वॉलकॉट हे त्यातील अन्य दोन फलंदाज होते. या तिघांनी मिळून विंडीजला सुमारे दशकभर क्रिकेट जगतावर वर्चस्व मिळवून दिले होते.
या तिघांनीही 1948 मध्येच कसोटी पदार्पण केले होते. वीक्स यांनी प्रशिक्षक म्हणून प्रचंड आदर मिळविला होता. याशिवाय ते विश्लेषक, संघव्यवस्थापक, आयसीसीचे सामनाधिकारी आणि आयसीसी हॉल ऑफ फेममधील एक सदस्य होते, असे वेस्ट इंडीज क्रिकेटने सांगितले. 22 व्या वर्षी त्यांनी इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हल येथे कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर दहा वर्षांनी त्रिनिदादमध्ये त्यांनी पाकिस्तानविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती.
5 कसोटी शतकांचा विश्वविक्रम
आपल्या कारकिर्दीत त्यांनी 48 कसोटीत 58.61 धावांच्या सरासरीने 4455 धावा जमविल्या. 1948 मध्ये सलग पाच कसोटी शतके झळकावण्याचा विश्वविक्रमही त्यांनी केला होता. जमैका कसोटीत इंग्लंडविरुद्ध 141 धावा जमविल्यानंतर भारताविरुद्ध त्यांनी 128, 194, 162, 101 धावा जमविल्या होत्या. त्याच्या पुढील डावात ते 90 धावांवर धावचीत झाल्याने सहावे शतक हुकले होते. त्यांचे समकालीन वॉरेल यांचे 1967 मध्ये तर वॉलकॉट यांचे 2006 मध्ये निधन झाले होते. या तिघांनाही नाईटहूड किताबाने सन्मानित करण्यात आले होते.
सर्वकालीन सर्वाधिक सरासरी
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वाधिक सरासरी राखणाऱया पहिल्या दहा खेळाडूंत जॉर्ज हेडली यांच्यासमवेत वीक्स यांचा समावेश आहे. ‘एमसीसी व लॉर्ड्सवरील प्रत्येकजण वीक्स यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर दुखी झाले आहेत,’ असे एमसीसीने निवेदनाद्वारे सांगितले. वीक्स, वॉरेल व वॉलकॉट या तिघांचाही 18 महिन्यांच्या अंतराने ऑगस्ट 1924 ते जानेवारी 1926 या कालावधीत बार्बाडोसमध्ये जन्म झाला होता आणि तिघांनीही 1948 मध्ये तीन आठवडय़ाच्या कालावधीत कसोटी पदार्पण केले होते. तिघांनी मिळून एकूण 39 शतकांची नोंद केली होती. ‘विंडीजच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी अशी वीक्स यांची ओळख कायम स्मरणात राहील,’ असे विंडीज क्रिकेटचे अध्यक्ष रिकी स्केरिट म्हणाले. ‘ते एक सभ्य आणि उत्तम व्यक्तिमत्त्वाचे गृहस्थ होते. गेल्या वर्षी त्यांच्याशी भेट घेण्याचा योग आला तेव्हा ते गंभीर आजारातून नुकतेच बरे झाले होते,’ असेही स्केरिट यांनी सांगितले. जून 2019 मध्ये वीक्स यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता. बार्बाडोस विभागात त्यांनी खूप मानाचे स्थान मिळविले होते, असेही त्यांनी सांगितले.
क्रिकेट वर्तुळावर शोककळा
वीक्स यांच्या निधनाचे वृत्त समजल्यावर अनेक माजी खेळाडूंनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘विंडीजने क्रिकेट जगतावर वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली, त्यात तीन डब्ल्यूजपैकी वीक्स यांची भूमिका फार मोलाची ठरली होती. या तिघांनी एकत्रित 39 शतके झळकवली होती,’ असे आयसीसीने आपल्या संदेशात म्हटले आहे. भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. ‘महान फलंदाज वीक्स यांची बार्बाडोसमध्ये झालेल्या आयसीसीच्या कॉन्फरन्सवेळी भेट झाली होती. ते सामनाधिकारी असताना झालेल्या चर्चेची चांगली आठवण असल्याचे कुंबळे यांनी सांगितले.
अशाच भावना माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, इंग्लंडचे माईक आथरटन, विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केल्या. गेल्या दोन दशकांत त्यांच्या भेटीचा योग अनेकदा आल्यावर ही संधी सोडत नव्हतो. त्यांच्याकडून प्रत्येकवेळी काहीना काही शिकावयास मिळत असे. अतिशय उत्तम व आदरणीय व्यक्तिमत्त्वाचे ते होते,’ असे बिशप यांनी सांगितले.









