विंडीजचा सलग दुसरा विजय, कँपबेल-नेशन यांची 123 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी,कॉनेलची 3 बळी
डय़ुनेडिन/ वृत्तसंस्था
विंडीज महिला संघाने आयसीसी महिला वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लिश महिला संघाला पराभवाचा धक्का देत आणखी एकदा खळबळ उडवून दिली. या निकालामुळे विद्यमान विजेत्या इंग्लंडला बाद फेरीत पोहोचण्यासाठी बरीच पराकाष्ठा करावी लागेल, असे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारच्या लढतीत विंडीजने निर्धारित 50 षटकात 6 बाद 225 धावा केल्या तर प्रत्युत्तरात इंग्लंडला 47.4 षटकात सर्वबाद 218 धावांवर समाधान मानावे लागले.
प्रथम फलंदाजी करताना, अनुभवी दियान्द्रा डॉटिन (64 चेंडूत 31) व हेले मॅथ्यूज (58 चेंडूत 45) यांनी 81 धावांची सलामी दिल्यानंतरही विंडीजला 50 षटकात 6 बाद 225 अशा माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. यष्टीरक्षक-फलंदाज शेमेन कॅम्पबेल (80 चेंडूत 66) व चेदन नेशन (74 चेंडूत 49) यांनी पाचव्या गडय़ासाठी 123 धावांची भागीदारी साकारत या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.
प्रत्युत्तरात, सोफी इक्लेस्टोन (नाबाद 33) व केट क्रॉस (27) यांनी नवव्या गडय़ासाठी 61 धावांची भागीदारी साकारल्यानंतर इंग्लंडने जवळपास विजय मिळवलाच होता. मात्र, नंतर ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा डाव 47.4 षटकात 218 धावांवर आटोपला. विंडीज महिला संघाचा इंग्लंडविरुद्ध हा वर्ल्डकप इतिहासातील पहिला विजय ठरला.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार जिंकणाऱया कॅम्पबेलने 4 तर नेशनने 3 चौकार फटकावले. एरवी कॅरिस्ब्रूक पार्कची खेळपट्टी सीम गोलंदाजीला पोषक मानली जाते. मात्र, डावखुरी ऑर्थोडोक्स मंदगती गोलंदाज इक्लेस्टोनने (10 षटकात 3-20) सर्वात किफायतशीर मारा साकारला. तिने मधल्या षटकात उत्तम मारा करत विंडीज फलंदाजांना जखडून ठेवले.
जेव्हा इंग्लंडने डावाला सुरुवात केली, त्यावेळी फलंदाजीला आणखी प्रतिकूल स्थिती होती. एकवेळ इंग्लंडचा डाव 4 बाद 72 असा गडगडला आणि 36 व्या षटकाअखेर त्यांची 8 बाद 156 अशी अवस्था झाली होती. नंतर इक्लेस्टोन व क्रॉस यांनी आश्चर्यकारक भागीदारी साकारत इंग्लंडला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. पण, शेवटच्या 3 षटकात अवघ्या 9 धावांची आवश्यकता असताना क्रॉस नॉन स्ट्रायकर एण्डकडे धावचीत झाली आणि अन्या श्रबसोलला फिरकीपटू अनिसा मोहम्मदने (2-24) त्रिफळाचीत करत इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला.
अवघ्या 7 धावांनी निसटता विजय संपादन केल्यानंतर विंडीजच्या गोटात आनंदोत्सव साजरा होणे साहजिकच होते. पेसर शामिलिया कॉनेलने विंडीजतर्फे (3-38) सर्वात यशस्वी मारा केला. विंडीज कर्णधार स्टेफानी टेलरने या लढतीत तब्बल 8 गोलंदाज आजमावून पाहिले.
संक्षिप्त धावफलक
विंडीज ः 50 षटकात 6 बाद 225 (शेमेन कॅम्पबेल 66, चेडन नेशन 49, सोफी इक्लेस्टोन 3-20). इंग्लंड ः 47.4 षटकात सर्वबाद 218. (सोफी इक्लेस्टोन नाबाद 33, अनिसा मोहम्मद 2-24, शमिलिया कॉनेल 3-38).
कोट्स
आजच्या लढतीतील खेळपट्टी आम्हाला प्रतिकूल होती. काटेकोर गोलंदाजी करावी लागेल आणि त्याला पूरक उत्तम क्षेत्ररक्षण करावे लागेल, याची पूर्ण कल्पना होती. या बाबी नजरेसमोर ठेवत आम्ही आमची रणनीती आखली आणि त्यात यशही आले.
-विंडीज महिला संघाची कर्णधार स्टेफानी टेलर
विंडीजने प्रारंभी उत्तम फलंदाजी केली. आम्ही नंतर त्यांच्या फटकेबाजीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरलो. पण, कॅम्पबेल-नेशन यांची भागीदारी वेळीच रोखता आली नाही, त्याची पराभवाच्या रुपाने मोठी किंमत मोजावी लागली. या पराभवामुळे आम्ही अर्थातच निराश झालो आहोत.
-इंग्लिश महिला संघाची कर्णधार हिदर नाईट
सलग दुसऱया पराभवामुळे इंग्लंड सहाव्या स्थानी!
साखळी फेरीत इंग्लिश महिला संघाचा हा सलग दुसरा पराभव असून या नामुष्कीमुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी फेकले गेले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत.









