वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
यजमान विंडीजने रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी पाकवर केवळ एक गडी राखत पहिल्या कसोटीत रोमांचक विजय मिळवित दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली. आता या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना येत्या शुक्रवारपासून सबिना पार्क मैदानावर खेळविला जाईल. विंडीजच्या जेडेन सील्सला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात पाकने पहिल्या डावात 217 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 253 धावा जमवित पहिल्या डावात 36 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर पाकने दुसऱया डावात 203 धावा जमवित विंडीजला निर्णायक विजयासाठी 168 धावांचे माफक आव्हान दिले आणि संघर्ष करीत विंडीजने दुसऱया डावात 56.5 षटकांत 9 बाद 168 धावा जमवित हा सामना केवळ एक गडी राखत जिंकला.
पाकच्या दुसऱया डावामध्ये कर्णधार बाबर आझमने 55, अबीद अलीने 34, अझहर अलीने 23, मोहम्मद रिझवानने 30, अश्रफने 20 व हसन अलीने 28 धावा जमविल्या. विंडीजतर्फे सील्सने 55 धावांत 5 तर रॉचने 30 धावांत 3 तसेच मेयर्स व होल्डर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विंडीजला निर्णायक विजयासाठी 168 धावांची जरूरी होती. पण पाकच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत विंडीजवर चांगलेच दडपण आणले होते. विंडीजचे फलंदाज ठरारिक अंतराने बाद झाले. त्यांचा निम्मा संघ 92 धावांत तंबूत परतला होता. पॉवेल दुसऱयाच षटकांत 4 धावांवर पायचीत झाला. त्यानंतर कर्णधार ब्रेथवेट केवळ 2 धावा काढून तंबूत परतला. बॉनेरने 5 धावा जमविल्या. विंडीजचे हे तिन्ही फलंदाज शाहीन आफ्रिदीने बाद केले. चेस आणि ब्लॅकवूड यांनी चौथ्या गडय़ासाठी 68 धावांची भागिदारी केली. चेसने 22 धावा जमविल्या. अश्रफने त्याला झेलबाद केले. त्यानंतर हसन अलीने ब्लॅकवूडला 55 धावांवर बाद करून विंडीजवर अधिकच दडपण आणले. मेयर्सला आपले खाते उघडता आले नाही. अश्रफने त्याला झेलबाद केले. जेसन होल्डर 16 धावा जमवित हसन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. शाहीन आफ्रिदीने डिसिल्वाला 13 धावांवर झेलबाद केले. हसन अलीने वॉरीकेनला 6 धावांवर झेलबाद करून विंडीजला चांगलेच अडचणीत आणले. विंडीजची स्थिती यावेळी 9 बाद 151 अशी होती. त्यांना विजयासाठी आणखी 17 धावांची जरूरी होती. दरम्यान रॉच आणि सील्स या शेवटच्या जोडीने विंडीजला विजय मिळवून दिला. रॉचने 52 चेंडूत नाबाद 30 तर सील्सने 13 चेंडूत नाबाद 2 धावा जमविल्या. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 50 धावांत 4, हसन अलीने 37 धावांत 3 तर अश्रफने 29 धावांत 2 गडी बाद केले.
या सामन्यात विंडीजच्या रॉचला पाककडून दोन जीवदाने मिळाली. या जीवदानाचा लाभ घेत रॉचने हसन अलीच्या गोलंदाजीवर विजयी धाव घेतली. या सामन्यात 125 धावांत 8 बळी मिळविणाऱया विंडीजच्या सील्सला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. पाकच्या गोलंदाजांना शेवटच्याक्षणी शिस्तबद्ध गोलंदाजी करता आली नाही तसेच गचाळ क्षेत्ररक्षण झाल्याने विंडीजला हा सामना जिंकता आला. पाककडून विंडीजच्या दुसऱया डावात 3 सोपे झेल सुटले आणि पाकला पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी 2000 साली झालेल्या मालिकेतील निर्णायक कसोटीत पाकला केवळ एका गडय़ाने पराभव पत्करावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 217, विंडीज प. डाव 253, पाक दु. डाव 203 (बाबर आझम 55, अबीद अली 34, अझहर अली 23, मोहम्मद रिझवान 30, अश्रफ 20, हसन अली 28, सील्स 5-55, रॉच 3-30, मेयर्स 1-33, होल्डर 1-36), विंडीज दु. डाव 56.5 षटकांत 9 बाद 168 (ब्लॅकवूड 55, रॉच नाबाद 30, चेस 22, होल्डर 16, डिसिल्वा 13, सील्स नाबाद 2, शाहीन आफ्रिदी 4-50, हसन अली 3-37, अश्रफ 2-29).









