प्रतिनिधी/ कोयना वसाहत
काही दिवसांपूर्वी कराड-ढेबवाडी रस्त्यावर कणसे मळा बसथांब्यावर एका बिबटय़ाच्या बछडय़ाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला होता. दरम्यान, काल रात्री कराड-ढेबेवाडी रस्त्यावर विंग-शिंदेवाडी गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरसाचा मृत्यू झाला.
विंग शिंदेवाडी (ता. कराड) जवळच्या पेट्रोल पंपासमोर सोमवारी पहाटे ही घटना निदर्शनास आली. मार्निंग वाकला जाणाऱया ग्रामस्थांना तरस मृत्युमुखी पडल्याचे दिसले. येथील राजेश पाचुपते, मनोहर लोहार, मधुकर लोहार यांनी वनविभागाला कळवले. वनविभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन मृत तरसाला ताब्यात घेतले. वनक्षेत्रपाल तुषार नवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनंत जगताप कर्मचारी घटनेचा तपास घेत आहेत. साधारण दीड वर्षाचा तरस होता, असे कर्मचाऱयांनी माहिती देताना सांगितले. कराड-ढेबवाडी रस्त्यावर येथील कणसेमळा बसथांब्यावर बिबटय़ाच्या बछडय़ाचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला होता. महिन्याभरात ही दुसरी घटना घडली आहे.









