विरोधकांची आक्रमक भूमिका, जुन्या वाहिनीला जोडली नवीन वाहिनी, अखंड पाणी पुरवठा हे राहणार केवळ स्वप्नच
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी शहरासाठी सुरु असलेल्या सुधारीत पाणी योजनेचे उद्घाटन करायचे ठरले, पण तेवढय़ातच जलवाहिनी फुटली म्हणून सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सलग दुसऱया दिवशी पुन्हा जलवाहिनी फुटली. एवढे सगळे करून जुन्याच जलवाहिनीला नवीन वाहिनी जोडण्याचे खूप मोठे काम सत्ताधारी करत आहेत. तटरक्षक दलाच्या तळाजवळील वाहिनीचे काम वेळेत करवून न घेणे हे सत्ताधाऱयांचे पूर्ण अपयश आहे, अशी घणाघाती टीका रत्नागिरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समीर तिवरेकर यांनी केली.
ते म्हणाले, कोटय़वधी रूपये खर्चाची सुधारीत पाणी योजना शासनाने मंजूर केली. विशिष्ट कंत्राटदार सत्ताधाऱयांच्या आवडीचा होता म्हणून त्यालाच हे काम मिळावे याकरीता सत्ताधाऱयांनी खटपट केली. या कामासाठी आवडीचा कंत्राटदार नेमला खरा पण त्याची क्षमता हे काम पूर्ण करण्याची नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे गेली तरी काम काही मार्गी लागत नाही.
ते पुढे म्हणाले, तटरक्षक दलाच्या विमान तळाच्या आसपास सध्या शीळ ते रत्नागिरी ही जलवाहिनी आहे. तिचे स्थलांतर अधिक सोयीच्या जागी करावे असे तटरक्षक दलाचे म्हणणे आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंत्राटदाराने काम मार्गी लावले नाही. कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी नगर परिषदेतील सत्तधारी पूर्णपणे अपयशी ठरले. यामुळे आज तेथे जुनीच जलवाहिनी अस्तित्वात आहे. या वाहिनीला नवीन वाहिनी जोडण्याचे जबरदस्त काम सत्ताधाऱयांना करावे लागत आहे.
त्यांनी आणखी सांगितले, जुन्या वाहिनीला नवीन वाहिनी जोडण्याचे भारी काम सत्ताधाऱयांनी केल्यावर वारंवार वाहिनी फुटणार हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नाही. अपेक्षित दाबाने शहराला पाणी येणे ही बाब अजूनतरी स्वप्न ठरणार आहे. कंत्राटदारांकडून काम वेळेत न होणे हे सपशेल अपयश असले तरी त्याचा फटका रत्नागिरीकरांना बसत आहे. रत्नागिरीकर ही बाब सहन करणार नाहीत.
नगर सेवक मुन्ना चवंडे म्हणाले, हे सर्व राहुल पंडित यांचे कृत्य आहे. त्यांनी आपल्याला हवा अशा कंत्राटदाराला काम दिले पण ते मार्गी लागले नाही. त्यांचे कृत्य सामान्याला भोगावे लागले आहे. लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
परजिह्यातील किंवा राज्या बाहेरील कुशल माणसे पाणी योजनेच्या कामाला उपलब्ध होत नसतील तर त्यांना रत्नागिरी जिह्यात आणण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. याकरीता लागेल ते सहकार्य देऊ असे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी यापूर्वीच रत्नागिरी नगर परिषदेला कळवले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रत्नागिरी नगर परिषदेतील गटनेते सुदेश मयेकर म्हणाले, लोकांना पाणी योजना पूर्ण झालेली हवी आहे. ती वेळेत पूर्ण न होणे हे सत्ताधाऱयांचे अपयश आहे. लोकांनी नगराध्यक्ष, आमदार, खासदार यांना याविषयी नक्कीच जाब विचारला पाहिजे. आश्वासने देणारे भरपूर आहेत पण प्रत्यक्ष कार्यवाही होणे गरजेचे आहे.
टाळेबंदीमुळे कामाचा खोळंबा : पांडकर
तटरक्षक दलाच्या विमानतळाच्या आसपासची जलवाहिनी अन्य ठिकाणी हलवण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदार उस्मानाबाद येथे आहे. टाळेबंदीमुळे त्याला रत्नागिरीत येणे शक्य झाले नाही. यास्तव हे काम मागे पडले आहे. टाळेबंदी संपताच हे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. आंतरजिल्हा प्रवास परवानगीचा मुद्दा असल्याने काम सुरु होऊ शकले नाही, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अविनाश पांडकर यांनी दिली.









