विविध कंपन्यांची आकडेवारी जाहीर : वार्षिक विक्रीत टाटा, होंडाची कमाई
वृत्तसंस्था/ मुंबई
डिसेंबर महिन्यासह वर्षभरातील वाहन विक्रीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये मारुती सुझुकीची विक्री चार टक्के इतकी घसरली आहे. होंडाची डिसेंबरमधील विक्री घटलेली असली तरी वर्षात 26 टक्के वाढ नोंदवली आहे. तर टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीने मात्र वाढ दर्शवली आहे. एकंदरच डिसेंबरमध्ये वाहनांच्या विक्रीत म्हणावा तसा उत्साह मात्र दिसला नाही.
ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने डिसेंबर 2021 मध्ये 1 लाख 53 हजार 149 वाहनांची विक्री केली आहे. डिसेंबर 2020 मध्ये सदरच्या कंपनीने 1 लाख 60 हजार 226 वाहनांची विक्री केली होती. दुसरीकडे टाटा मोटर्सने डिसेंबर 2021 मध्ये 35 हजार 299 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. यातुलनेमध्ये मागच्या वर्षी समान महिन्यात 23 हजार 545 वाहनांची विक्री झाली होती. म्हणजेच प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 50 टक्के इतकी वाढ झाली आहे. मारुतीची अल्टो आणि एक्सप्रेसो वाहनांची विक्री 35 टक्क्यांनी घटून 16,320 वर पोहोचली. मागच्या वर्षी समान महिन्यामध्ये 24,927 वाहनांची विक्री झाली होती. याचप्रमाणे कॉम्पॅक्ट वाहन प्रकारामध्ये स्वीफ्ट, सेलेरियो, इग्निस, बोलेरो आणि डिझायर आदी वाहनांची विक्री 11 टक्क्यांनी घटून 69,345 वर पोहोचली आहे. सेडान सियाजची विक्री 1204 इतकी राहिली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये सियाजच्या विक्रीमध्ये घट दिसली आहे. पण सुखद बाब ही की, विटारा ब्रिझा, एस क्रॉस आणि इर्टिगा यांची विक्री पाच टक्के वाढली आहे.
होंडा कार्सची विक्री 26 टक्के वाढली
दुसरीकडे होंडा कार्सची वाहन विक्री मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 26 टक्के इतकी वाढल्याचे दिसले. 2021 मध्ये कंपनीच्या 89,192 वाहनांची विक्री झाली. यापूर्वीच्याच म्हणजे 2020 वर्षी कंपनीने 70,593 वाहनांची विक्री केली होती. स्थानिक बाजारामध्ये डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 7,973 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत याच महिन्यात पाहता विक्रीत 8 टक्के घट दिसली.
टाटा मोटर्सची दमदार विक्री
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखी एक कंपनी टाटा मोटर्सने मागच्या महिन्यामध्ये वाहन विक्रीत दमदार कामगिरी नोंदवली आहे. डिसेंबर 2021 मध्ये टाटा मोटर्सने 35,299 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. या तुलनेत मागच्या समान महिन्यामध्ये कंपनीने नाममात्र 23,545 वाहनांची विक्री केली होती. डिसेंबरला संपलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱया तिमाही अखेर 99,002 प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षीच्या समान तिमाहीतील तुलनेत वाढ 44 टक्के अधिक आहे. दुसरीकडे कंपनीने वर्षभरात म्हणजेच 2021 मध्ये एकूण 3 लाख 33 हजारहून अधिक कार्सची विक्री केली आहे.
हय़ूंडाईच्या वाहन विक्रीत 21 टक्के वाढ
हय़ूंडाईने वर्ष 2021 मध्ये 21 टक्के इतकी वाढ नोंदवून 6 लाख 35 हजार वाहनांची विक्री करण्यामध्ये यश मिळविले आहे. 2020 मध्ये 5 लाख 22 हजार 542 वाहनांची विक्री करण्यात आली होती.









