बसुर्ते येथील त्या युवकाच्या कुटुंबाला मिळाला न्याय
प्रतिनिधी/ बेळगाव
दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील तरुणाने दुचाकी चालवून थांबलेल्या ट्रक्टर ट्रॉलीला धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला. त्यानंतर मयत झालेल्या त्या तरुणावरच पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. मात्र न्यायालयामध्ये त्याच्या कुटुंबियांनी दावा दाखल केला असता न्यायालयाने कुटुंबांची बाजु उचलून धरत त्या युवकाच्या कुटुंबाला सात लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
भावकू कृष्णा नाईक (रा. बसुर्ते, ता. बेळगाव) हा वाहन चालविण्याचा परवाना नसताना मोटार सायकल क्रमांक केए 22 ईजे 2538 वरुन बसुर्तेहून उचगावकडे जात होता. त्यावेळी कोवाड रोडवर रस्त्याच्या कडेला उसाची ट्रॉली थांबली होती. त्याला भावकू याने धडक दिली. यामध्ये त्याचा जागीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काकती पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
त्याच्या आई-वडिलांनी मात्र ट्रॉलीमुळे हा अपघात घडला म्हणून दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. त्या ठिकाणी ऍड. आण्णासाहेब घोरपडे यांनी युक्तीवाद करुन न्यायालयाला ट्रॉली चालकाचीच चुक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विमा कंपनीला न्यायाधीशांनी नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रॉली क्रमांक एमएच 44 सी 2834 च्या मालक व विमा कंपनीने 5 लाख 45 हजार 6 टक्के व्याजाने असे एकूण 7 लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मयताच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
तरुणांनो वाहन परवाना काढा
वाहन परवाना नसताना देखील नुकसान भरपाई मिळाली ही बाब दिलासा दायक आहे. असे असले तरी वाहन चालविताना स्वतःचा परवाना असणे हे अत्यंत गरजेचे आहे. न्यायालयात आम्ही युक्तीवाद करुन न्याय मिळवून देवू. मात्र त्याला अनेक बाजु असतात. त्यामुळे तरुणांनो प्रथम वाहन परवाना काढावा. त्यानंतरच वाहने चालवावीत, असे आवाहन ऍड. आण्णासाहेब घोरपडे यांनी केले आहे.









