महामार्ग पोलीस मदत केंद्र पथकाकडून अंमल
प्रतिनिधी / कुडाळ:
महामार्गावर धावणाऱया वाहनांच्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पुन्हा चूक घडू नये, म्हणून प्रबोधन करण्यावर भर देण्याचे आदेश नवनियुक्त अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्ये यांनी दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांचे प्रबोधन केले.
त्या अनुषंगाने जिल्हय़ातील महामार्ग पोलीस मदत केंद्र, कणकवली-कसाल या पथकाने अंमलबजावणी सुरू केली असून महामार्गावर पोलीस दंडात्मक कारवाईऐवजी कसूरदार वाहन चालकांचे प्रबोधन करताना दिसून येत आहेत. यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस मदत केंद्र (कसाल-कणकवली) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली.रस्त्यावर धावणाऱया वाहनांच्या चालकांवर केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांना वाहतुकीचे नियम आणि अपघाताची नेमकी कारणे समजावून सांगितल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास सहाय्य होईल. केवळ दंडात्मक कारवाई हा अपघात नियंत्रणासाठी प्रभावी इलाज नाही. त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. महामार्ग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व त्यांची टीम प्रबोधन करत आहे.









